लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत किमती प्रचंड वाढलेल्या असतानाही भारतात मात्र सोन्याच्या आयातीत मोठी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी २०२५-२६) सोन्याची आयात तब्बल २८.७३ टक्क्यांनी वाढून ६९ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. वाणिज्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
सोन्याच्या आयातीतील या प्रचंड वाढीचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून व्यापार तूट वाढून ३१०.६० अब्ज डॉलर्स झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच काळात ही तूट २६१.८० अब्ज डॉलर्स इतकी होती. सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे चालू खात्यातील तुटीवर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा दर १० ग्रॅममागे सुमारे १,५३,८०० रुपये (सर्व करांसह) इतका उच्च स्तरावर आहे.
भारताची सोने आयात कुणाकडून?
- स्वित्झर्लंड ४०%
- यूएई १६%
- दक्षिण आफ्रिका १०%
सोने-चांदी दागिन्यांच्या आयातीवर ‘कडक लगाम’, परवानगी लागणार
- केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीसंदर्भात मोठा धोरणात्मक बदल केला असून, ही आयात आता ‘मुक्त’ श्रेणीतून काढून ‘मर्यादित’ श्रेणीत टाकण्यात आली आहे.
- यामुळे आयातदारांना आता प्रत्येक आयातीसाठी सरकारकडून विशेष परवाना (लायसन्स) घ्यावा लागणार आहे. हे नियम तत्काळ लागू झाले असून, कोणतीही सवलत नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे.
- काही व्यापारी ‘एफटीए’चा वापर करून कमी शुल्कात दागिने आयात करत होते. त्यामुळे भारतीय उत्पादकांना फटका बसत होता. नव्या नियमांमुळे स्वदेशी उद्योगाला चालना मिळणार आहे.
स्वित्झर्लंडचेच सोने का हवे?
- केवळ फेब्रुवारी महिन्यात स्वित्झर्लंडकडून होणाऱ्या आयातीत ७१९ टक्क्यांची अफाट वाढ नोंदवण्यात आली आहे. रिफायनिंग हब असल्याने हा पुरवठा सुरू आहे.
- चीननंतर भारत हा सोन्याचा दुसरा सर्वांत मोठा ग्राहक असून, दागिन्यांच्या मागणीमुळे ही आयात केली जाते. एकूण आयातीत सोन्याचा वाटा आता ५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
