गेल्या काही दिवसांपूर्वी विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचलेले सोन्याचे दर आता घसरताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे, लग्नसराईला सुरुवात होणार असतानाच ही घसरण दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारापासून ते स्थानिक सराफा बाजारांपर्यंत या घसरणीचा परिणाम दिसून येत आहे. यामुळे विवाहसोहळा किंवा गुंतवणुकीसाठी आपण सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर, जाणून घ्या ताजे दर...
आंतरराष्ट्रीय बाजारात शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत सोन्याचा दर 4013.40 डॉलर प्रति औंस (सुमारे 28.34 ग्रॅम) एवढा नोंदवला गेला, जो आदल्या दिवशीच्या तुलनेत 25 डॉलरने कमी आहे. शुक्रवारी हा दर 4038.20 डॉलर होता. चांदीत 0.48 टक्क्यांची किरकोळ घसरण झाली असून ती आज शनिवारी 48.250 डॉलर प्रति औंसवर होती, तर काल 48.730 डॉलरवर होती.
देशांतर्गत बाजारात मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) आणि इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) शनिवारी आणि रविवारी बंद असतात. यामुळे त्यांच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवसाचे दर गृहित धरले जातात. MCX वर शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 224 रुपयांनी घसरून 1,21,284 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. जो गुरुवारी 1,21,508 रुपयांवर होता. मात्र चांदीच्या दरात 112 रुपयांची वाढ होऊन ती 1,48,399 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
IBJA नुसार 31 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,20,770 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता, तर चांदीचा दर 1,49,125 रुपये प्रति किलो झाला. आठवडाभरात सोन्याच्या किमतीत 1589 रुपयांची घट नोंदली गेली, तर चांदीच्या किमतीत तब्बल 4094 रुपयांची वाढ झाली आहे.
