Gold, Silver : जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि डॉलरची वाढती मजबुती यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत आज मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून विक्रमी स्तरावर असलेल्या मौल्यवान धातूंच्या किमती आता खाली येऊ लागल्याने सामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः चांदीच्या दरात एकाच दिवसात ५,००० रुपयांची मोठी पडझड झाली आहे.
चांदीच्या दरात ५,००० रुपयांची 'कपात'
चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन आला आहे. कालपर्यंत २,६५,००० रुपये प्रति किलो असलेल्या चांदीचा भाव आज २,६०,००० रुपयांवर खाली आला आहे. अवघ्या २४ तासांत ५,००० रुपयांची ही घसरण लग्नसराईच्या हंगामात दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी मानली जात आहे.
सोन्याच्या किमतीत ६०० रुपयांची घसरण
सोन्याच्या दरातही थोडी घसरण पाहायला मिळाली. २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅमचा दर १,४३,५०० रुपयांवरून घसरून १,४२,८५० रुपयांवर आला आहे. (६५० रुपयांची घट). तर २४ कॅरेट सोने कालच्या १,५०,६८० रुपयांच्या तुलनेत आज हे दर १,४९,९९० रुपयांपर्यंत खाली आले आहेत (६९० रुपयांची घट).
वाचा - पीएफ खातेदारांसाठी 'गुड न्यूज'! सलग तिसऱ्या वर्षी 'इतके' व्याज मिळण्याची शक्यता, 'या' दिवशी निर्णय
जागतिक बाजारात 'बार्गेन हंटिंग' सुरू
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर प्रति औंस ४,९०० डॉलरच्या खाली आल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली आहे. नॅटिक्सिसचे विश्लेषक बर्नार्ड दहदाह यांच्या मते, जोपर्यंत मोठी भू-राजकीय घडामोड घडत नाही, तोपर्यंत गेल्या वर्षीसारखी प्रचंड तेजी पुन्हा दिसण्याची शक्यता कमी आहे. यावर्षी सोन्याचा सरासरी दर ४,८५० डॉलरच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
