Travel Insurance News: परदेश प्रवासाचं नियोजन करताना लोक सहसा विमान तिकीट, हॉटेल आणि प्रेक्षणीय स्थळांवर जास्त लक्ष देतात, परंतु 'इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स'कडे (International Travel Insurance) दुर्लक्ष करतात. तज्ज्ञांच्या मते, योग्य इन्शुरन्स प्लॅन नसल्यास अचानक उद्भवलेली वैद्यकीय आणीबाणी, विमानाला होणारा विलंब किंवा सामान गहाळ होणं यांसारख्या समस्या प्रवाशांच्या खिशाला जड पडू शकतात. फोनपे इन्शुरन्सचे सीईओ विशाल गुप्ता यांनी या संदर्भात प्रवाशांकडून होणाऱ्या सामान्य चुका आणि घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
विशाल गुप्ता यांच्या मते, विम्याची रक्कम कमी ठेवणे ही प्रवाशांची सर्वात मोठी चूक असते. शेंगेन व्हिसासाठी किमान ३०,००० युरोचं मेडिकल कव्हरेज आवश्यक असले तरी, अमेरिका आणि युरोपसारख्या महागड्या देशांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने ते पुरेसं नाही. तेथे आयसीयूचा एका दिवसाचा खर्चही या रकमेपेक्षा जास्त असू शकतो. याशिवाय, अनेक प्रवासी मधुमेह किंवा उच्च रक्तदाबासारखे जुने आजार लपवतात, ज्यामुळे नंतर क्लेम नाकारला जाण्याची शक्यता असते. केवळ वैद्यकीय खर्चावर लक्ष केंद्रित करणं देखील तोट्याचं ठरू शकते. विमानाला उशीर झाल्यास होणारा हॉटेल आणि जेवणाचा खर्च तसंच सामान हरवल्यास मिळणारी भरपाई यांचाही पॉलिसीमध्ये समावेश असणं गरजेचं आहे. तसेच, अनेकदा पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या खर्चांवर 'सब लिमिट' असतं, ज्यामुळे एकूण कव्हरेज जास्त असूनही प्रत्यक्षात मिळणारा क्लेम कमी होतो.
कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
उद्देश आणि कालावधी आवश्यक
पॉलिसी निवडताना प्रवासाचे ठिकाण, प्रवासाचा उद्देश आणि कालावधी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये वैद्यकीय खर्च अतोनात असल्यानं तिथे कव्हरेजची रक्कम जास्त असावी, तर दक्षिण पूर्व आशिया किंवा मध्य पूर्वेकडील देशांसाठी ती मध्यम असली तरी चालू शकते. जर प्रवास व्यवसायानिमित्त असेल, तर विमानाला होणारा विलंब आणि लॅपटॉप कव्हर यांसारख्या बाबी महत्त्वाच्या ठरतात. याउलट, पर्यटनासाठी किंवा साहसी सहलीसाठी कार रेंटल, क्रूझ आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचं कव्हर असणं फायदेशीर असते.
ज्येष्ठ नागरिकांना खबरदारी घ्यावी
ज्येष्ठ नागरिकांनी विमा घेताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे. त्यांनी आपल्या जुन्या आजारांची पूर्ण माहिती देऊन कॅशलेस हॉस्पिटलायझेशनची सुविधा असलेली पॉलिसी निवडावी. विमा घेण्यापूर्वी त्याच्या सर्व अटी, अटींमधील वगळलेले भाग आणि 'डिडक्टिबल' या गोष्टी वाचणं महत्त्वाचं आहे. योग्य नियोजनामुळे परदेशातील अनपेक्षित संकटांपासून स्वतःचं आर्थिक संरक्षण करणं शक्य होते.
