Gensol Engineering shares: जेनसोल इंजिनीअरिंगच्या शेअर्सच्या स्थितीत आजही सुधारणा झालेली नाही. मंगळवार, १३ मे रोजी कंपनीच्या शेअर्सना पुन्हा लोअर सर्किट लागलं. या लोअर सर्किटमुळे आज कंपनीच्या शेअर्सची किंमत ५१.८४ रुपयांवर आली. ही कंपनीची ५२ आठवड्यांची नवी नीचांकी पातळी आहे. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी जेनसोल इंजिनीअरिंगच्या शेअरची किंमत २३९२.०५ रुपये होती. कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत सोमवारी मोठी बातमी आली. जेनसोल इंजिनीअरिंगचे संचालक अनमोल सिंग जग्गी आणि पूर्णवेळ संचालक पुनीत सिंग जग्गी यांनी राजीनामा दिला आहे. हे दोन्ही मोठे राजीनामे सेबीच्या आदेशानंतर देण्यात आलेत. हे दोन्ही राजीनामे १२ मे पासून लागू झाले आहेत.
संकटात कंपनी
गेल्या महिन्यात सेबीनं जग्गी बंधूंना पुढील सूचना मिळेपर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली होती. कंपनीच्या कर्जाच्या निधीचा वापर त्यांनी वैयक्तिक कारणांसाठी केल्याचा आरोप आहे. यामुळे कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक गैरव्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
२६० कोटी रुपयांचा प्रश्न
सेबीनं आपल्या अंतरिम आदेशात म्हटलंय की, जेनसोलमध्ये निधीचा गैरवापर करण्यात आला. इरेडा आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशननं मिळून या कंपनीला ९७८ कोटी रुपयांचे कर्ज दिलं. या फंडांच्या माध्यमातून कंपनी ब्लूस्मार्टसाठी ६४०० इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणार होती. पण कंपनीनं ५६७ कोटी रुपयांना ४७०० वाहने खरेदी केली. उर्वरित २६० कोटी रुपये लक्झरी रिअल इस्टेट खरेदीसाठी वापरण्यात आले, असं एक्स्चेंजनं म्हटलं आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)