Gautam Adani News: जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ब्लॅकरॉक आणि सर्वात यशस्वी हेज फंडांपैकी एक असलेल्या सिटाडेल यांनी गौतम अदानी यांचे कर्ज विकत घेण्यासाठी बोलणी सुरू केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७५० मिलियन डॉलर्सचं कर्ज खरेदी करण्यासाठी बोलणी सुरू आहेत, ज्याचं अदानी समूहाला रिफायनान्सिंग करायचं आहे. अमेरिकेत लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप असलेल्या अदानी यांच्यासाठी हा करार मैलाचा दगड ठरू शकतो. ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जातात. कारण ब्लॅकरॉक १० ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त संपत्तीचं व्यवस्थापन करते. भारतात ब्लॅकरॉकनं टाटा मोटर्स आणि रिलायन्स जिओच्या फायनान्शियल सर्व्हिसेससोबत भागीदारी केली आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
२०२२ मध्ये अपोलो ग्लोबल मॅनेजमेंटने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) कडून ७५० मिलियन डॉलर्सच्या सीनिअर सिक्युअर्ड प्रायव्हेट प्लेसमेंट नोट्स खरेदी केल्या. एमआयएएल ही अदानीची कंपनी असून ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) ऑपरेट करते. एमआयएएलचा बहुतांश भाग अदानी एअरपोर्टहोल्डिंग्स लिमिटेड (AAHL) या अदानी एंटरप्रायझेसच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील दुसरं सर्वात मोठं विमानतळ आहे.
अदानींचा एअरपोर्ट बिझनेस
एप्रिल-मे २०२५ नंतर या सात वर्षांच्या कर्जाच्या अटी आणि किंमती अधिक कडक होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाला या कर्जाचं रिफायनान्सिंग करायचं आहे. याशिवाय अनेक विमानतळांच्या अपग्रेडेशन आणि विस्तारासाठी अदानी समूहाला एएएचएलमध्ये ७५० दशलक्ष डॉलर्स उभे करायचे आहेत. यापैकी ३०० मिलियन डॉलर्स नवीन कर्ज असेल आणि उर्वरित रिफायनान्सिंग केलं जाईल. अदानी समूह २०१९ पासून विमानतळ व्यवसायात आहे आणि सध्या भारतातील सर्वात मोठा खासगी ऑपरेटर आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू, मुंबई, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम येथील विमानतळांचा समावेश आहे.
ब्लॅकरॉक आणि सिटाडेलशी बोलणी सुरू असून येत्या काही दिवसांत करार होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. मात्र, हा करार पार पडेलच याची शाश्वती नाही. हा समूह इतर जागतिक संघटनांशीही बोलणी करत आहे, परंतु त्यांच्या नावांची स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकली नाही. मात्र, त्यात तथ्य नसल्याचं सिटाडेलच्या प्रवक्त्यानं सांगितलं. अदानी समूह, ब्लॅकरॉक आणि अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत.