Kedarnath Dham : देशातील अनेक भाविकांची केदारनाथ धामची यात्रा करण्याची इच्छा असते. मात्र, खडतर प्रवास असल्याने अनेकांना इच्छा मारावी लागत होती. आता हे स्वप्न सहज सत्यात उतरणार आहे. प्रसिद्ध व्यावसायिक आणि अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी आता उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये एक मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट उभारणार आहेत. या प्रोजेक्टमुळे केदारनाथला भेट देणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास अत्यंत सोपा आणि सुरक्षित होणार आहे.
अदानी ग्रुप केदारनाथ धामला सोनप्रयागपासून जोडणारा एक अत्याधुनिक रोपवे तयार करणार आहे. गौतम अदानी यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर या प्रोजेक्टचा व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली.
गौतम अदानींच्या भावना
गौतम अदानी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, "केदारनाथ धामची कठीण चढाई आता सोपी होईल. अदानी समूह भाविकांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी हा रोपवे बनवत आहे. या पुण्यकार्याचा भाग बनणे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे." त्यांनी पोस्टचा समारोप 'जय बाबा केदारनाथ' या संदेशाने केला आहे.
प्रोजेक्टची किंमत आणि कालावधी
या नवीन प्रोजेक्टसाठी अदानी ग्रुपने एकूण ४०८१ कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या रोड्स, मेट्रो, रेल आणि वॉटर डिव्हिजनद्वारे याचे बांधकाम केले जाईल. अदानी कंपनीला हा रोपवे बांधून पुढील २९ वर्षांपर्यंत त्याचे संचालन करण्याचा अधिकार मिळाला आहे. केदारनाथ रोपवे प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी जवळपास ६ वर्षांचा कालावधी लागू शकतो.
केदारनाथ धाम की कठिन चढ़ाई अब आसान होगी।
— Gautam Adani (@gautam_adani) October 15, 2025
अदाणी समूह श्रद्धालुओं की यात्रा को सरल और सुरक्षित बनाने के लिए यह रोपवे बना रहा है।
इस पुण्य कार्य का हिस्सा बनना हमारे लिए गर्व की बात है।
महादेव सब पर अपनी कृपा बनाए रखें।
जय बाबा केदारनाथ!#Adanipic.twitter.com/9f3VIGAWt6
भाविकांना होणारे मोठे फायदे
या रोपवे प्रोजेक्टमुळे भाविकांच्या प्रवासात मोठे परिवर्तन येणार आहे. या रोपवेची एकूण लांबी १२.९ किलोमीटर असेल. सध्या सोनप्रयाग ते केदारनाथ हे अंतर पायी पार करण्यासाठी भाविकांना ९ तासांपर्यंत वेळ लागतो. मात्र, रोपवे सुरू झाल्यावर हे अंतर केवळ ३६ मिनिटांत पूर्ण करता येईल. यामुळे विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर असलेल्या भाविकांचा प्रवास अत्यंत सोपा आणि आरामदायक होईल.
वाचा - दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
हा मेगा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर केदारनाथ धामची यात्रा अधिक सुलभ होईल, तसेच उत्तराखंडमधील पर्यटनालाही मोठा फायदा मिळेल.