Penny Stock: फ्युचर ग्रुपची आघाडीची कंपनी फ्युचर सप्लाय चेन सोल्यूशन्स लिमिटेडचे (Future Supply Chain Solutions Ltd Share) शेअर्स यंदा सातत्यानं चर्चेत आहेत. कंपनीचा शेअर १.७३ रुपयांवर आलाय. ही त्याची ३० डिसेंबर रोजीची किंमत आहे. या शेअरचं मंगळवारी ट्रेडिंग बंद होतं. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास ८५ टक्क्यांची घसरण झाली. या दरम्यान त्याची किंमत ११ रुपयांवरून सध्याच्या किमतीवर आली.
शेअर्सची स्थिती
फ्यूचर सप्लाय चेन सोल्यूशन्सचे शेअर्स गेल्या महिनाभरात १५ टक्के आणि सहा महिन्यांत ५० टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनीचा शेअर एका वर्षात ८५ टक्के आणि पाच वर्षांत ९९ टक्क्यांनी घसरलाय. पाच वर्षांपूर्वी शेअरचा भाव ४५५ रुपये होता. म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदारानं या कालावधीत या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आतापर्यंत गुंतवणूक कायम ठेवली असती तर ही रक्कम आज ३८० रुपयांवर आली असती.
कंपनी काय करते?
फ्यूचर सप्लाय चेन सोल्यूशन्स वेअरहाऊसिंग, वाहतूक, वितरण प्रणाली आणि लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रदान करते. या कंपनीचं कामकाज फ्युचर एंटरप्रायजेसद्वारे पाहिलं जातं. फ्युचर ग्रुपच्या बहुतांश कंपन्या दिवाळखोरीत जाऊ लागल्यानंतर फ्युचर सप्लाय चेनची पडझड सुरू झाली. २०१९ मध्ये कंपनी रिकव्हरीच्या जवळ होती, परंतु काही महिन्यांतच जगभरात महासाथीनं थैमान घातलं आणि भारतातील जवळजवळ सर्व स्टोअर्स बंद करण्यात आले.
स्टोअर्स बंद झाल्याने आणि खटल्यांमुळे फ्यूचर ग्रुपच्या सर्व कंपन्यांचा रोख प्रवाह कमी झाला, ज्यामुळे बँकांचं कर्ज थकलं. जानेवारी २०२३ मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) दिलेल्या आदेशानुसार फ्युचर सप्लाय चेन सोल्यूशन्सला कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रियेत ठेवण्यात आलं होतं.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)