Petrol-Diesel Price : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता जागतिक इंधन बाजाराच्या मुळावर उठला आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत महिनाभरात ४८ टक्क्यांची प्रचंड वाढ झाली असून, त्याचे पडसाद आता अमेरिका आणि आखाती देशांमधील पेट्रोल पंपांवर दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे, यूएईसारख्या तेल उत्पादक देशातही डिझेलच्या किमतीत विक्रमी ७२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
अमेरिकेत ३ वर्षांनंतर पेट्रोलची शंभरी!
अमेरिकेत गॅसोलीन (पेट्रोल) आणि डिझेलच्या किमतींनी गेल्या तीन वर्षांतील उच्चांक गाठला आहे.
- पेट्रोल : अमेरिकेत पेट्रोलचा दर ४ डॉलर प्रति गॅलन (सुमारे १०० रुपये प्रति लिटर) च्या पार गेला आहे. इराणवरील हल्ल्यानंतर किमतीत ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
- डिझेल : डिझेलचे दर ५ डॉलर प्रति गॅलनवर पोहोचले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून येथील डिझेल ४० टक्क्यांनी महागले आहे.
यूएई मध्ये १ एप्रिलपासून नवे दर लागू
संयुक्त अरब अमिरातीच्या फ्युएल प्राईस कमिटीने किमतीत मोठी वाढ जाहीर केली आहे. हे नवे दर उद्यापासून, म्हणजेच १ एप्रिलपासून लागू होतील.
- सुपर ९८ पेट्रोल: ३.३९ दिरहाम प्रति लिटर (सुमारे ८७ रुपये).
- स्पेशल ९५ पेट्रोल : ३.२८ दिरहाम प्रति लिटर. यात ३२% वाढ झाली आहे.
- डिझेलचा विक्रम : यूएईमध्ये डिझेल तब्बल ७२ टक्क्यांनी महागून ४.६९ दिरहाम प्रति लिटर (सुमारे १२० रुपये) वर पोहोचले आहे.
कच्च्या तेलाचा ग्राफ (ब्रेंट क्रूड)
- जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची स्थिती चिंताजनक आहे.
- सध्याचा दर: १०७.२८ डॉलर प्रति बॅरल.
- एका महिन्यातील वाढ: ४८ टक्के.
भारतात दरवाढीची टांगती तलवार?
जागतिक स्तरावर तेलाचे दर गगनाला भिडलेले असताना भारतीय ग्राहकांसाठी सध्या एक दिलासादायक बातमी आहे. जागतिक दरवाढ होऊनही भारतात अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यात आलेल्या नाहीत. सध्यातरी भारतीय तेल कंपन्यांकडून दरवाढ केली जाण्याची शक्यता कमी वर्तवण्यात येत आहे. मात्र, जर कच्च्या तेलाचे दर अशाच प्रकारे वाढत राहिले, तर तेल कंपन्यांवरील दबाव वाढू शकतो.
