Patanjali FSSAI : बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीचे अनेक प्रोडक्ट्स लोकप्रिय आहे. ही कंपनी अशीच उत्पादनं बनवतं, जी लोकांना खूप आवडतात, परंतु आता अन्न प्राधिकरण एफएसएसएआयनं पतंजलीच्या लाल मिरची पावडरबाबत एक आदेश दिलाय. एफएसएसएआयनं पतंजली कंपनीला आपली लाल मिरची पावडर मागे घेण्याचे आदेश दिलेत. काही नियमांचं पालन न केल्यानं पतंजलीवर ही कारवाई करण्यात आलीये. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण.
मागे घ्यावी लागणार लाल मिरची पावडर
पतंजली फूड्स लिमिटेडनं एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटल्यानुसार, अन्न सुरक्षेच्या नियमांचं पालन न केल्यामुळे पॅकेज्ड लाल मिरची पावडरची विशिष्ट बॅच परत मागवण्याचे निर्देश एफएसएसएआयनं कंपनीला दिले आहेत. नियामकानं १३ जानेवारी रोजी यासंदर्भात आदेश जारी केला असल्याचंही त्यांनी म्हटलं. अन्न सुरक्षा आणि मानके नियम, २०११ चं पालन न केल्यानं कंपनीला पॅकेज्ड लाल मिरची पावडरची संपूर्ण बॅच परत मागवण्याचे निर्देश एफएसएसएआयनं दिले आहेत.
१९८६ मध्ये कंपनीची सुरुवात
पतंजली फूड्स लिमिटेड ही बाबा रामदेव यांची आयुर्वेद समूहाची कंपनी आहे. ज्याची स्थापना १९८६ मध्ये झाली. ही कंपनी भारतातील अग्रगण्य एफएमसीजी कंपन्यांपैकी एक आहे. पूर्वी ही कंपनी रुची सोया या नावानं ओळखली जात होती. ही कंपनी खाद्यतेल, अन्न आणि एफएमसीजी आणि पवन ऊर्जा उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे. पतंजली रुची गोल्ड, न्यूट्रेला अशा विविध ब्रँडअंतर्गत उत्पादनांची विक्री करते.