Modern Farming Success : आजच्या आधुनिक काळात जिथे तरुण शेती सोडून शहरांकडे धाव घेत आहेत, तिथे मध्य प्रदेशातील एका तरुण शेतकऱ्याने शेतीतून कोट्यवधींची उलाढाल करून सर्वांना चकित केले आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील बदनूर गावच्या राहुल देशमुख यांनी आपल्या कष्टाच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर केवळ १३ लाखांचे कर्जच फेडले नाही, तर आज ते वर्षाला २ कोटी रुपयांची बंपर कमाई करत आहेत.
संकटातून उभा राहिला 'करोडपती' शेतकरी
राहुल यांचे वडील शेतकरी होते, मात्र राहुल स्वतः नोकरी करत होते. नोकरीत मन रमत नसल्याने ते शेतीचा विचार करत होते, अशातच वडिलांच्या निधनामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. परिस्थिती इतकी खालावली की राहुल यांच्यावर १३ लाख रुपयांचे कर्ज झाले. मात्र, खचून न जाता त्यांनी 'व्यावसायिक शेती'चा मार्ग स्वीकारला.
ओसाड जमिनीत पिकवलं सोनं
राहुल यांच्याकडे असलेली जमीन ओसाड होती आणि तिथे पाण्याची मोठी समस्या होती. पण जिद्द आणि नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी ही ओसाड जमीन सुपीक केली. त्यांनी प्रामुख्याने लसूण आणि टोमॅटोच्या लागवडीवर लक्ष केंद्रित केले.
नफ्याचे गणित
२०२३-२४ च्या हंगामात पहिल्याच लसणाच्या पिकातून राहुल यांनी १ कोटी रुपयांची कमाई केली. तर टोमॅटोच्या उत्पादनातून त्यांना सुमारे २५ लाख रुपयांचा नफा झाला. या उत्पन्नामुळे राहुल यांना केवळ कर्जमुक्त होण्यास मदत झाली नाही, तर त्यांचा आत्मविश्वासही कमालीचा वाढला.
४५ जणांना दिला रोजगार
राहुल देशमुख आता केवळ स्वतःसाठी कमवत नाहीत, तर त्यांनी गावातील ४५ लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ज्या जमिनीला लोक 'नापीक' म्हणून सोडून देत होते, आज तीच जमीन शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन बनली आहे. "माणसाने जर मेहनत आणि प्रामाणिकपणाने काम केले, तर कोणतीही ओसाड जमीन सोने पिकवू शकते. गरज आहे ती फक्त जिद्द आणि योग्य नियोजनाची," असे राहुल देशमुख अभिमानाने सांगतात.
वाचा - ५० देशांच्या जीडीपीपेक्षा BMC ची तिजोरी मोठी; पाहा मुंबई महापालिकेच्या सत्तेचे आर्थिक गणित
तरुण शेतकऱ्यांसाठी धडा
राहुल यांची ही यशोगाथा सिद्ध करते की, शेती हा तोट्याचा व्यवसाय नाही. जर पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञान आणि नगदी पिकांची जोड दिली, तर तरुण शेतकरी केवळ स्वावलंबी होणार नाहीत, तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी देतील.
