iPhone Making Campus : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपल कंपनीने भारतात आयफोन उत्पादन वाढवू नये, अशी इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांच्या या विधानाचा ॲपलचे सीईओ (CEO) टिम कुक यांच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन आता भारतातच बनवले जातील, असं स्पष्टपणे टिम कुक यांनी सांगितले आहे. ॲपलने हा महत्त्वाकांक्षी विस्तार वेगाने राबवण्यास सुरुवात केली आहे. ज्याची झलक कर्नाटकमधील फॉक्सकॉनचा (Foxconn) देवनहल्ली प्लांट आहे.
कर्नाटकमध्ये भव्य आयफोन उत्पादन केंद्र आणि वसतिगृह
जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी असलेल्या फॉक्सकॉनने कर्नाटकातील देवनहल्ली प्लांटमध्ये २.५६ अब्ज डॉलर्सची (सुमारे २१,३०० कोटी रुपये) मोठी गुंतवणूक केली आहे. दोडागोल्लाहड्डी आणि चप्परदहल्ली गावात पसरलेल्या ३०० एकर जागेवर कामगारांसाठी एक भव्य वसतिगृह बांधले जात आहे. बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे सुमारे २३ किलोमीटर अंतरावर आहे.
उत्पादन आणि गुंतवणुकीची योजना
फॉक्सकॉनने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात (२०२३-२४) ३,००० कोटी रुपये गुंतवले आहेत. दुसऱ्या टप्प्यात (२०२६-२७) तेवढीच रक्कम गुंतवण्याची त्यांची योजना आहे. या वर्षी डिसेंबरपर्यंत आयफोनचे उत्पादन लक्ष्य १,००,००० (एक लाख) निश्चित करण्यात आले आहे.
महिला कर्मचाऱ्यांना प्राधान्य आणि भव्य वसतिगृह
कंपनीकडून बांधल्या जाणाऱ्या या वसतिगृहात सुमारे ३०,००० कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय असेल आणि हे भारतातील पहिलेच अशा प्रकारचे मोठे सुविधा केंद्र असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. चीननंतर हे जगातील दुसरे सर्वात मोठे वसतिगृह मानले जात आहे. यापूर्वी, तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथेही चिनी मॉडेलवर एक वसतिगृह बांधण्यात आले आहे, जिथे सुमारे १८,००० कामगार राहू शकतात.
देवनहल्ली येथील या वसतिगृहात राहणाऱ्या ३०,००० कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ५० ते ८० टक्के महिला असतील, ज्यांना निवास व्यवस्थेत प्राधान्य दिले जाईल. 'प्रोजेक्ट एलिफंट' (Project Elephant) हा फॉक्सकॉनच्या 'चीन+१' (China+1) धोरणाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश चीनबाहेर उत्पादनात विविधता आणणे आहे. या विस्तारामुळे 'मेक इन इंडिया' उपक्रमाला मोठे बळ मिळणार असून, भारतात रोजगाराच्या संधींचीही लक्षणीय वाढ होणार आहे.