Lokmat Money > बिझनेस न्यूज > विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!

विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!

संस्थात्मक चलाखीच्या काळात भारतीय डेरिव्हेटिव्ह्ज गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 15:47 IST2025-07-18T15:44:51+5:302025-07-18T15:47:19+5:30

संस्थात्मक चलाखीच्या काळात भारतीय डेरिव्हेटिव्ह्ज गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन.

Foreign speculators are betting on the futures market small investors be vigilant and protect yourself | विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!

विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!

संदीप वाळुंज
ग्रूप मार्केटिंग ऑफिसर,
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस

संस्थांचा 'बोनस प्रेशर' आणि छोट्या गुंतवणूकदारांचा "FOMO" यांची अभद्र युती: भारतीय भांडवली बाजार परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी सट्टेबाजीचंही आकर्षक केंद्र बनला आहे. भारत आज जागतिक इक्विटी ऑप्शन्स व्यवहारांपैकी ९९% व्यवहारांचा केंद्रबिंदू ठरतो. हे चित्र बाजारातील तरलता आणि जोखीम दोन्ही अधोरेखित करते. १९ कोटींपेक्षा अधिक डीमॅट खात्यांद्वारे रिटेल गुंतवणूकदारांची व्यापक उपस्थिती असलेला भारतीय बाजार; विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs), हेज फंड्स आणि अल्गोरिदमिक ट्रेडर्ससाठी तिमाही बोनस आणि अल्फा कमवण्यासाठीही एक आकर्षण ठरत आहे.

परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारताची तुलनेने कमकुवत नियामक चौकट ही या आकर्षणाला अधिक गंभीर बनवते. या सोबतच को-लोकेशन सुविधांचा उदय, हलकी नियमबद्धता असलेली प्रॉप ट्रेडिंग डेस्क्स, आणि रिअल-टाइम निरीक्षणातील त्रुटी यामुळे बाजार आकर्षकतेबरोबरच अधिकच असुरक्षित होतो.

एफ अॅण्ड ओ मंच तसंच ‘टेलिग्राम आणि व्हॉटसअॅप’ वरुन मिळणाऱ्या ‘फ्री टिप्स’ आणि इन्फ्लुएन्सर्सच्या सुरस कथांनी आकर्षित होणारे आपले (अती) उत्साही परंतु या खेळात अनभिज्ञ असलेले भारतीय रिटेल गुंतवणूकदार, आपसूकच बऱ्याचदा या मोठ्या संस्थात्मक खेळाडूंचे लिंबू-टिंबू ‘काउंटर पार्टी’ ठरतात. SEBI कडून अलीकडेच जेन स्ट्रीट या संस्थेविरुद्ध करण्यात आलेली कारवाई हे या प्रकाराचे उदाहरण आहे.

बाजारातील खेळाची त्यांची रणनीति अशी आहेः

१. बाजार उघडताच निर्देशांक कृत्रिमरित्या वाढवणं, ऑप्शन रायटर्सना अडचणीत आणणं आणि दिवसाअखेरीस दिशा बदलून फायदा घेणं.

२. नकारात्मक अहवाल जाहीर करून, प्रसारमाध्यमांद्वारे त्याचा प्रचार करणं. या दरम्यान ऑफशोर स्वॅप्सद्वारे शॉर्ट पोझिशन्स घेतल्या जातात आणि परिणामी घबराटीमुळे विक्री वाढून (केवळ) त्यांना फायदा होतो.

३. लेटन्सी शोषण: ॲार्डर रद्द करणं व पुन्हा टाकणं इतक्या जलद गतीनं होते की रिटेल सिस्टिमला तो डेटा वेळेत दिसतच नाही. परिणामी, रिटेल गुंतवणूकदारांना अनिष्ट किंमतीवर व्यवहार करावा लागतो.

४. अपारदर्शक मालकी: संबंधित FPIs मध्ये पोजिशन्स बदलून खरी मालकी झाकली जाते, त्यामुळे बाजारात कोण ‘खरं’ नियंत्रण ठेवतो हे समजणं अवघड होते.

छोट्या गुंतवणूकदारांसाठी सप्तपदी

डेरिव्हेटिव्ह्ज सावधगिरीनं हाताळा:

F&O हा ‘झिरो सम गेम’ आहे - एखाद्याला जिंकण्यासाठी, एखाद्याला हरावंच लागतं. F&O एक्सपोजर तुमच्या पोर्टफोलीओच्या १०% पेक्षा कमी ठेवा - किंवा जोपर्यंत तुम्ही पेऑफ आणि मार्जिन याचे गणित पूर्णपणे समजून घेत नाही तोपर्यंत शून्य ठेवा.

गुंतवणूक करा, सट्टा खेळू नका

वेगाचा (गैर) फायदा घेणाऱ्या बड्या धेंडांशी तुम्ही स्पर्धा करू शकत नाही.

प्रतिष्ठित ब्रोकर्स निवडा

मजबूत नेट वर्थ आणि सिद्ध प्रामाणिकपणा असलेल्या सेबी-नोंदणीकृत फर्म वापरा. चमकदार नवीन-युगातील ब्रोकर्स लपलेली गुंतागुंत बाळगू शकतात.

सतर्क राहण्यासाठी अलर्ट्स चालू करा

डिपॉझिटरी एसएमएस/ईमेल तुम्हाला काही मिनिटांतच नव्हे तर काही महिन्यांतले अनधिकृत व्यवहार शोधू देतो.

अति अस्थिरतेपासून दूर रहा

एक्सपायरीच्या दिवशी पहिल्या १५ मिनिटांत जर व्यवहाराचा मोठा पट दिसला किंवा निर्देशांक विचित्र चढ-उतार करत असला, तर सावधगिरी बाळगा, खूप खात्री नसल्यास व्यवहार करू नका.

व्हायरल माहितीची शहानिशा करा

सोशल मीडियावरती आलेली माहिती तपासून पाहा. कंपनीचे निवेदन, कॉर्पोरेट फाइलिंग्स वाचल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका.

तक्रारी लवकर नोंदवा

सेबीच्या स्कोअर्स पोर्टलवर लगेचच तक्रार दाखल करा

प्रणालीत अजूनही आवश्यक असलेल्या सुधारणा:

सेबी ने एफपीआय मालकीबाबत ‘लुक-थ्रू’ नियमांची कठोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे.

तसंच, एक्सपायरी दिवशी होणाऱ्या संशयास्पद हालचाली व किंमत-खरेदी विसंगती ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निरीक्षण प्रणाली आवश्यक आहे.

भारतानं परदेशी बाजार नियामकांशी सहकार्य करताना सामंजस्य करार अधिक बळकट करणं आवश्यक आहे.

तसंच, गुंतवणुकीच्या उपयुक्ततेचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत.

निष्कर्ष: तुमचं स्वतःचं वर्तनच सर्वोत्तम संरक्षण

भारतीय शेअर बाजारात अमर्याद वाढीच्या संधी आहेत.परंतु हेच वातावरण अत्यंत वेगवान प्रणाली आणि भांडवलशक्ती असलेल्या जागतिक खेळाडूंनाही आकर्षित करतं. त्यामुळे खरा बचाव आहे ते म्हणजे तुमचं शिस्तबद्ध वर्तन.

लक्षात ठेवा : माहिती ही भांडवलाहूनही ताकदवान ‘कंपाऊंडर’ आहे.

संयम बाळगा : धैर्यवान गुंतवणूकदारच शेवटी खऱ्या अर्थानं श्रीमंत ठरतात.

Web Title: Foreign speculators are betting on the futures market small investors be vigilant and protect yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.