Walmart To Slash Jobs : जगावर मंदीचं सावट अधिक गडद होत असल्याचं दिसत आहे. याचा फटका आतापर्यंत तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना बसत होता, पण आता ही लाट ई-कॉमर्स आणि रिटेल क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग आणि अमेझॉनसारख्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर, आता या यादीत आणखी एका मोठ्या कंपनीची भर पडली आहे. फ्लिपकार्टची मूळ कंपनी वॉलमार्ट.
१५०० कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
फ्लिपकार्टची मूळ कंपनी असलेल्या अमेरिकेतील दिग्गज रिटेल कंपनी वॉलमार्टने आपल्या पुनर्रचना प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुमारे १,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखली आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने कंपनीतील अंतर्गत सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, कंपनीचे काम अधिक सुरळीत आणि प्रभावीपणे चालवणे, हा या कपातीमागील मुख्य उद्देश आहे.
कुठे होणार कपात?
वॉलमार्टच्या जागतिक तंत्रज्ञान विभाग, अमेरिकेतील स्टोअर्समधील ई-कॉमर्स ऑपरेशन्स आणि कंपनीचे जाहिरात युनिट वॉलमार्ट कनेक्ट (Walmart Connect) यासह विविध विभागांतील कर्मचाऱ्यांवर या नोकर कपातीचा परिणाम होणार आहे.
कंपनी भाकरी फिरवणार
कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या दीर्घकालीन धोरणांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी काही पदे काढली जातील, तर काही नवीन पदे निर्माण केली जातील. रिटेलचे भविष्य निश्चित करणाऱ्या अनुभवांमध्ये आपली प्रगती आणखी वेगवान करण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
वॉलमार्ट ही अमेरिकेतील सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे, जिथे सुमारे १६ लाख कर्मचारी काम करतात. जगभरात या कंपनीमध्ये सुमारे २१ लाख लोक कार्यरत आहेत. अमेरिका चीनमधून आयात करत असलेल्या एकूण वस्तूंपैकी सुमारे ६०% वस्तू वॉलमार्ट चीनमधून आयात करते, ज्यात कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि खेळणी यांचा समावेश आहे.
वाचा - ३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
कंपनीमध्ये सुरू असलेले इतर बदल
नोकर कपातीचा हा निर्णय कंपनीमध्ये अलीकडे होत असलेल्या अनेक बदलांचाच एक भाग मानला जात आहे. फेब्रुवारी महिन्यात वॉलमार्टने त्यांचे उत्तर कॅरोलिना येथील कार्यालय बंद केले होते आणि कर्मचाऱ्यांना कॅलिफोर्निया आणि अर्कांसस येथे हलवले होते. गेल्या आठवड्यात, कंपनीने मे महिन्याच्या अखेरपर्यंत काही वस्तूंच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. यासाठी वॉलमार्टने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या व्यापार धोरणांनंतर निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांचा हवाला दिला होता. या नोकर कपातीमुळे रिटेल आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.