FBI Director Kash Patel : प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं हे वाक्य तुम्हालाही माहिती असेल. पण, हे सर्व स्वतःच्या पैशावर आणि हिमतीवर करत असेल तर ठीक आहे. मात्र, एका हाय-प्रोफाइल बातमीने सध्या अमेरिकेचे लक्ष वेधून घेतले आहे, जी एखाद्या चित्रपटकथेपेक्षा कमी नाही. देशाची सर्वात मोठी तपास यंत्रणा असलेल्या एफबीआयचे डायरेक्टर काश पटेल यांच्यावर आपल्या गर्लफ्रेंडचा कार्यक्रम पाहण्यासाठी कोट्यवधी डॉलर्सच्या सरकारी विमानाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खास असलेले काश पटेल यांच्या या कथित कृतीने सोशल मीडियापासून ते न्यूज रूम्सपर्यंत मोठी खळबळ उडवून दिली आहे.
खासगी प्रवासासाठी सरकारी विमानाचा वापर
एफबीआयचे डायरेक्टर काश पटेल यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी सुमारे ६० मिलियन डॉलर (जवळपास ५०० कोटी रुपये) किंमतीच्या सरकारी विमानाचा वापर खासगी प्रवासासाठी केला. अहवालानुसार, काश पटेल मागील आठवड्यात पेंसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी येथे गेले होते. याच ठिकाणी त्यांची गर्लफ्रेंड आणि प्रसिद्ध कंट्री सिंगर ॲलेक्सिस विल्किन्स यांचा कार्यक्रम होता. २५ ऑक्टोबर रोजी एका सरकारी विमानाने वर्जीनियाच्या मनासस रीजनल एअरपोर्टवरून उड्डाण केले आणि ४० मिनिटांत पेंसिल्व्हेनियाच्या स्टेट कॉलेज एअरपोर्टवर उतरले. याच दिवशी ॲलेक्सिस विल्किन्स यांचा कार्यक्रम होता.
'शटडाऊन'च्या काळात जनतेच्या पैशांची उधळपट्टी?
माजी एफबीआय एजंट काइल सेराफिन यांनी हा खुलासा केला आणि काश पटेल यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, "जेव्हा सरकार स्वतः 'शटडाउन'च्या काळातून जात आहे आणि कर्मचाऱ्यांना पगार देण्यात अडचणी येत आहेत, तेव्हा एफबीआयचे प्रमुख करदात्यांच्या पैशांनी आपल्या गर्लफ्रेंडचा शो पाहायला जात आहेत." त्यांनी या कृतीला 'जनतेच्या पैशांची उधळपट्टी' असे म्हटले आहे.
नियमांचे उल्लंघन नाही, उलट बचत केली : एफबीआय
दुसरीकडे, एफबीआयने या आरोपांचे जोरदार खंडन केले आहे. एजन्सीच्या पब्लिक अफेअर्सचे असिस्टंट डायरेक्टर बेन विलियमसन यांनी 'X' वर स्पष्टीकरण दिले. बेन विलियमसन यांच्या म्हणण्यानुसार, काश पटेल यांनी कोणताही नियम मोडला नाही, उलट त्यांनी आपल्या प्रवासातून एफबीआयचे पैसे वाचवले आहेत. पटेल नेहमी महागड्या हवाई अड्ड्यांऐवजी सरकारी एअरफिल्डचा वापर करतात, ज्यामुळे एजन्सीची अडीच पट बचत होते. त्यांनी सांगितले की, काश पटेल यांनी पूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या तुलनेत खूप कमी खासगी प्रवास केला आहे आणि ते २४x७ ड्युटीवर असतात.
वाचा - आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
या वादामुळे अमेरिकेतील नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की, एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला खासगी कारणांसाठी एवढ्या महागड्या सरकारी संसाधनांचा वापर करण्याचा हक्क आहे का, भलेही त्याने पैसे वाचवण्याचे मार्ग अवलंबले असले तरीही. काही लोक याला 'करदात्यांच्या पैशांची हवाई सफर' म्हणत टीका करत आहेत.
