गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढलेले सोने-चांदीचे दर ऐन दिवाळीत कोसळू लागले आहे. आज जगातील विविध भागात सोने आणि चांदीचे दर कोसळले. आता या दरांममध्ये आणखी घट होऊ शकते. जागतिक बाजारामध्ये मंगळवारी झालेल्या विक्रमी घटीनंतर आता गुरुवारी २३ ऑक्टोबर रोजी भारतीय बाजारामध्येही सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घटतील असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. मात्र ही घट तात्कालीन असेल तसेच ती फार काळ टिकणार नाही, असा अंदाजही वर्तवला जात आहे.
भारतीय बाजार एमसीएक्सवर सोने-चांदीच्या दरांनी १७ ऑक्टोबर २०२५ रोजी वाढीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते. तेव्हापासून आतापर्यंत सोने प्रति १० ग्रॅम ४००० रुपयांनी तर चांदी सुमारे २० हजार रुपये प्रति किलो एवढी स्वस्स झाली आहे. मात्र ही घट अजून होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. त्याचं कारण म्हणजे गेल्या दोन दिवसांमध्ये जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच एमसीएक्समध्ये सणांमुळे कामकाज बंद होतं. अशा परिस्थितीत गुरुवारी कामकाज सुरू झाल्यावर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात.
मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. इंट्रा डेदरम्यान, सोन्याचे दर ६.३ टक्क्यांनी घटले. तर चांदीचे दर इंट्रा डेमध्ये ७.१ टक्क्यांनी घटले. ही गेल्या १२ वर्षांतील सर्वात मोठी घट होती. दरम्यान, बुधवारी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये पाच वर्षांतील सर्वाधिक घट दिसून आली. व्यापारी वर्गाकडून नफावसुली सुरू झाल्याने ही घट झाली आहे.
तज्ज्ञांनी सांगितले की, ही घट दिवाळीच्या सणावारांच्या दिवसांनंतर दरात ही घट झाली आहे. या काळात भारतात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. दरम्यान, सोने, चांदीच्या दरात होत असलेल्या चढउताराच्या काळात ग्राहकांनी धैर्य बाळगण्याची गरज असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
