Falguni Nayar Success Story : वयाच्या पन्नाशीत आल्यानंतर प्रत्येकाला निवृत्तीचे वेध लागतात. अशा स्थितीत फाल्गुनी नायर यांनी आपली चांगली नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. गुंतवणूक बँकर म्हणून यशस्वी करिअर सोडून उद्योजकता स्वीकारणाऱ्या फाल्गुनी नायर आज देशातील सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला अब्जाधीश ठरल्या आहेत. 'फोर्ब्स'च्या २०२५ च्या ताज्या आकडेवारीनुसार, त्यांची एकूण संपत्ती ३९,५५५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यांच्या या प्रवासाने देशातील लाखो महिला उद्योजिकांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
इन्व्हेस्टमेंट बँकर ते 'ब्युटी क्वीन'
फाल्गुनी नायर यांनी आपल्या करिअरची अनेक वर्षे कोटक महिंद्रा कॅपिटलमध्ये घालवली. मात्र, २०१२ मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी आपल्या सुरक्षित नोकरीचा त्याग केला. भारतातील सौंदर्य प्रसाधने आणि कॉस्मेटिक्स बाजारपेठेत असलेली मोठी दरी त्यांच्या लक्षात आली होती. फ्रान्स आणि जपानसारख्या देशांत सौंदर्य प्रसाधनांची मोठी बाजारपेठ असताना भारतात मात्र ग्राहकांना चांगल्या ब्रँड्ससाठी धडपडावे लागत होते. हीच गरज ओळखून त्यांनी 'नायका' या स्टार्टअपचा पाया रचला.
केवळ ३ कर्मचाऱ्यांपासून सुरुवात
नायकाची सुरुवात अत्यंत साध्या पद्धतीने झाली. फाल्गुनी नायर यांना रिटेल किंवा आयटी क्षेत्राचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही त्यांनी अवघ्या तीन कर्मचाऱ्यांच्या साथीने हे धाडस केले. सुरुवातीला स्वतःच्या बचतीतून सुमारे १८ कोटी रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी हा व्यवसाय उभा केला. आज त्यांची कंपनी, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स, शेअर बाजारात सूचीबद्ध असून देशातील अग्रगण्य रिटेल कंपन्यांपैकी एक आहे.
जागतिक स्तरावर उमटवला ठसा
फोर्ब्सच्या २०२५ च्या यादीनुसार, फाल्गुनी नायर यांनी जागतिक स्तरावरही आपली मोहोर उमटवली आहे. देशातील सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला उद्योजिका. तर जगातील सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिलांच्या यादीत ३१ व्या क्रमांकावर आहेत.
कौटुंबिक साथ आणि विदेशी गुंतवणूक
फाल्गुनी नायर यांचा मुलगा आणि मुलगी दोन्ही आज व्यवसायात सक्रिय असून बोर्डमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हॉंगकॉंगचे दिग्गज अब्जाधीश हॅरी बंगा यांनी देखील नायकावर विश्वास दाखवत मोठी गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे ब्रँडच्या विस्ताराला वेग मिळाला आहे.
वाचा - आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
फाल्गुनी नायर यांच्या यशाची ३ महत्त्वाची सूत्रे
- बाजारातील उणीव ओळखा : त्यांनी ग्राहकांच्या अशा गरजा ओळखल्या ज्याकडे तोपर्यंत कोणीही लक्ष दिले नव्हते.
- धाडस करण्याची तयारी : वयाच्या अशा टप्प्यावर रिस्क घेतली जेव्हा बहुतेक लोक निवृत्तीचा विचार करतात.
- गुणवत्तेवर भर : केवळ उत्पादने विकणेच नाही, तर मूळ आणि अस्सल उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांनी भर दिला.
