आरबीआयने रेपो दरात कपात केली तरीही बँका वाहन कर्जासाठी ग्राहकांना त्याचा लाभ देत नसल्यावरून वाहन डीलर्सची संघटना फाडाने आरबीआयकडे तक्रार केली आहे. यामध्ये फाडाने खासगी बँकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
फाडानुसार खासगी बँका रेपो दरात कपात झाल्याचा फायदा ग्राहकांना वेळेवर देत नाहीत. यासाठी बँका चालढकल करतात. तर सरकारी बँका लगेचच वाहन कर्ज ग्राहकांना याचा फायदा देतात.
तुमच्या नेतृत्वाखाली RBI ने आतापर्यंतच्या सर्वात जलद दराने व्याजदर कमी केले आहेत. जे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक सकारात्मक संकेत आहे. परंतु त्याचा परिणाम ऑटो रिटेल क्षेत्रात दिसून येत नाही, असे फाडाने आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांना पत्र लिहिले आहे. खाजगी बँका त्यांच्या अंतर्गत निधी खर्चाचे कारण देत व्याजदर कपातीचा लाभ देण्यास विलंब करत असल्याचा आरोप फाडाचे उपाध्यक्ष साई गिरीधर यांनी केला आहे.
सर्व बँकांना व्याजदरातील बदलांचे फायदे ग्राहकांना वेळेवर देणे बंधनकारक करावे, तसेच खाजगी बँकांकडून ऑटो लोन कमी झालेल्या व्याजदराने देण्याबाबत होणाऱ्या विलंबाचा आढावा घ्यावा. यासाठी कठोर सूचना कराव्यात, जेणेकरून सर्व ग्राहकांना समान लाभ मिळू शकतील, अशी मागणी फाडाने केली आहे. बँका ऑटो कर्जांवर १०० टक्के जोखीम वजन लागू करतात, तर गृह कर्जांवर ते फक्त ४० टक्के आहे. परंतू वाहन ही अशी मालमत्ता आहे जी घरापेक्षाही सहजपणे विकता येते. यामुळे ऑटो फायनान्सवरील जोखीम कमी करायला हवी. असे झाले तर पुढील ५ वर्षांत कर्ज वितरण २० टक्क्यांनी वाढू शकते, असेही फाडाने म्हटले आहे.