या दिवाळीत, भारतीय ग्राहकांच्या खरेदीचा नवा पॅटर्न समोर आला आहे. दिवाळीत प्रीमियम मोबाइल फोन, मोठ्या स्क्रीनचे टीव्ही आणि उच्च दर्जाच्या घरगुती उपकरणांच्या विक्रीत वाढ झाली आहे. ३० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्मार्टफोनची विक्री सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. प्रथमच, ३२ इंच टीव्ही मॉडेल्सच्या तुलनेत अधिक विक्री ४३ इंच आणि त्याहून मोठ्या आकाराच्या टीव्हींची झाली. या सणासुदीच्या हंगामात उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या विक्रीत सरासरी ४५ ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विक्री का वाढली?
कमी झालेले जीएसटी दर, ग्राहकांच्या भावनांमध्ये सुधारणा, सुलभ ग्राहक वित्त योजना आणि प्रीमियम उत्पादनांवर आकर्षक ऑफर यामुळे विक्रीत वाढ झाली. इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचं म्हणणं आहे की, हा सणासुदीचा हंगाम आतापर्यंतचा सर्वात उत्साहवर्धक राहिला आहे. ज्यामुळे बाजारात नवीन ऊर्जा आली आहे.
कोणत्या वस्तूंची मागणी?
साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर, फ्रंट-लोड वॉशिंग मशीन आणि ७५ इंचांपर्यंतचे मोठे टीव्ही यासारख्या प्रीमियम उत्पादनांना मोठी मागणी होती. दिवाळीपूर्वीच अनेक कंपन्यांचे मोठ्या क्षमतेचे मॉडेल्स आऊट ऑफ स्टॉक होते.
रिपोर्ट काय सांगतो?
मोबाइल फोन ट्रॅकर काउंटर पॉइंट रिसर्चनुसार, ३० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्मार्टफोनचा एकूण विक्रीत २८ टक्के वाटा आहे. या विभागात ६४-६५ टक्के स्मार्टफोन कर्ज घेऊन खरेदी केले गेले. हा आकडा सहसा ५३-५४ टक्के दरम्यान असतो. टीव्ही श्रेणीमध्येही विक्रमी वाढ झाली. ४३-इंच टीव्हीची विक्री एकूण विक्रीच्या २८ टक्केपर्यंत पोहोचली आहे.
