मुंबई :विमान प्रवासाच्या दरम्यान कोणतीही विपरित परिस्थिती निर्माण होऊ शकते, याचा विचार करत प्रशिक्षणासाठी तयार केलेल्या सिम्युलेटर मशिनच्या प्रशिक्षणामध्ये इंडिगोच्या वैमानिकांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी नागरी विमान वाहतूक (डीजीसीए) महासंचालनालयाने कंपनीच्या तब्बल १,७०० वैमानिकांना कारणे दाखवा नोटिसा जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या महिन्यात डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या सिम्युलेटर प्रशिक्षणासंदर्भात नोंदणीची तपासणी केली. त्यात अधिकाऱ्यांना त्रुटी आढळल्या.
या प्रकरणात नोटिसा जारी केलेल्या १,७०० जणांमध्ये विमानांचे मुख्य वैमानिक आणि सहवैमानिक यांचा समावेश आहे.
सिम्युलेटरवर प्रशिक्षण घेतले नसल्याचे आढळले
ज्या वैमानिकांना नोटिसा जारी करण्यात आल्या, त्या वैमानिकांनी लेह, कॅलिकत, काठमांडू यांसारख्या महत्त्वपूर्ण विमानातळांसाठी आवश्यक असे प्रशिक्षण सिम्युलेटरवर घेतले नसल्याचे डीजीसीएच्या तपासणीत आढळल्यामुळे या नोटिसा जारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.