EPFO Latest News: कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच अशी प्रणाली आणत आहे, ज्यामुळे ईपीएफ खातेधारकांना एटीएम आणि यूपीआयद्वारे देखील आपला पीएफ काढता येईल. केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, मार्च २०२६ पूर्वी ही सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. ते म्हणाले की, सध्याही कर्मचारी ७५% ईपीएफ त्वरित काढू शकतात, परंतु येणाऱ्या काळात ही प्रक्रिया अधिक डिजिटल आणि सोपी होईल.
काय आहे तपशील?
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सध्याच्या पीएफ काढण्याच्या प्रक्रियेवरही भाष्य केलं. ईपीएफमधील पैसे पूर्णपणे कर्मचाऱ्यांचे असतात, परंतु सध्या ते काढण्यासाठी अनेक प्रकारचे फॉर्म भरावे लागतात. यामुळे अनेकदा लोकांना त्रास होतो आणि क्लेम मंजूर होण्यास विलंब होतो. या अडचणी लक्षात घेऊन, सरकार ईपीएफ प्रणाली अधिक सोपी करण्यासाठी सतत काम करत आहे, जेणेकरून कर्मचारी कोणत्याही त्रासाशिवाय आपले पैसे वेळेवर काढू शकतील, असंही त्यांनी नमूद केलं.
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
पीएफशी संबंधित मोठ्या सुधारणांना मंजुरी
अलीकडेच ईपीएफओने पीएफशी संबंधित अनेक मोठ्या सुधारणांना मंजुरी दिली आहे. पूर्वी पीएफ काढण्यासाठी १३ वेगवेगळ्या श्रेणी होत्या, ज्यामध्ये वेगवेगळ्या अटी आणि सेवा कालावधी निश्चित करण्यात आले होते. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता आणि अनेक दावे नाकारले जात होते. आता या सर्व श्रेणींना एकत्र करून नियम सोपे करण्यात आले आहेत. यासोबतच मोठी गोष्ट म्हणजे, आता पीएफ काढताना केवळ कर्मचाऱ्यांचं योगदानच नव्हे, तर नियोक्त्याचे योगदान आणि त्यावर मिळणारं व्याज देखील समाविष्ट असेल. म्हणजेच, आता ७५% पीएफ काढल्यास पूर्वीपेक्षा जास्त रक्कम हातात येईल.
पात्रतेचे नियमही सोपे
पात्रतेचे नियमही सोपे करण्यात आले आहेत. पूर्वी वेगवेगळ्या कारणांसाठी २ ते ७ वर्षांपर्यंतची सेवेची अट होती, परंतु आता ती सर्व प्रकरणांसाठी समान करून १२ महिने करण्यात आली आहे. म्हणजेच, एका वर्षाच्या नोकरीनंतर कर्मचारी जास्त रक्कम काढू शकतो.
बेरोजगारीच्या स्थितीत ७५% पीएफ त्वरित काढता येतो आणि उर्वरित २५% एका वर्षानंतर काढता येतो. तसंच, ५५ वर्षांच्या वयानंतर निवृत्ती, कायमस्वरूपी अपंगत्व, नोकरीवरून काढून टाकणं, व्हीआरएस किंवा विदेशात कायमस्वरूपी स्थायिक होण्याच्या स्थितीत संपूर्ण पीएफ काढता येतो. थोडक्यात, ईपीएफओ आता पीएफ प्रणालीला पूर्णपणे डिजिटल, जलद आणि कर्मचाऱ्यांसाठी सोपी बनवण्याच्या दिशेनं मोठं पाऊल टाकत आहे.
