कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employee Provident Fund) ८ कोटी सक्रिय सदस्यांना येत्या काही दिवसांत मोठा दिलासा मिळणार आहे. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना जून २०२५ पासून आपल्या ग्राहकांसाठी सेल्फ अटेस्टेशन (Self-Attestation Facility) सुविधा सुरू करणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना केवायसी प्रक्रिया (KYC Process) पूर्ण करण्यासाठी त्यांच्या एम्पलॉयरची परवानगी घेण्याची गरज भासणार नाही.
केवायसीद्वारे सेल्फ अटेस्टेशन
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ) ग्राहकांसाठी केवायसी ही वन टाईम प्रक्रिया आहे जी ग्राहकांना युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी (UAN) जोडताना त्यांच्या केवायसी तपशीलांची पडताळणी करण्यास मदत करते. सध्या कर्मचाऱ्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एम्पलॉयरची मंजुरी आवश्यक असते. ग्राहकांसाठी सेल्फ अॅटेस्टेशन सुविधा सुरू केल्यानं सबस्क्रायबर्सना हे करणं सोपं जाईल आणि कंपनीची मंजुरी मिळण्यात लागणारा वेळ वाया जाणार नाही. अनेकदा कंपन्या बंद पडल्यानंतर ग्राहकांसाठी केवायसी करण्याची प्रक्रिया रखडते. ही नवी सुविधा सुरू झाल्यानं ती प्रक्रिया संपेल, तसंच ईपीएफ दावे फेटाळण्याचे प्रकारही कमी होतील.
ईपीएफओ ३.० मध्ये ही सुविधा
ईपीएफओ ३.० लाँच करण्याच्या तयारीत ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. ईपीएफओ आपल्या आयटी पायाभूत सुविधांमध्ये बदल करत आहे, ज्यामुळे रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनांच्या अंमलबजावणीनंतर ईपीएफओवर वाढणाऱ्या कामाचा ताण व्यवस्थापित करणं शक्य होईल.
ईएलआय योजना लागू झाल्यानंतर ईपीएफओ सदस्यांची संख्या १० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. आयटी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्यास ईपीएफओ आपल्या सदस्यांना अधिक चांगल्या सेवा प्रदान करण्यास सक्षम होईल.
काढू शकता फंड
कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून मार्च २०२५ च्या अखेरीस ईपीएफओ ३.० सुरू करणं अपेक्षित आहे आणि ते नवीन आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून लागू होईल. ईपीएफओ ३.० अंतर्गत, बँकांच्या सहकार्यानं एक सुविधा सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये ईपीएफ ग्राहक त्यांच्या कॉर्पसमधून एका मर्यादेपर्यंत पैसे काढू शकतील. यासाठी क्लेमसाठी अर्ज करण्याची गरज भासणार नाही.
कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएओ एक असं व्यासपीठ तयार करीत आहे ज्यामध्ये ग्राहक कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्या कष्टानं कमावलेले पैसे काढू शकतील, असं म्हटलं होतं.