EPFO New Updates : तुमच्या नावे जर पीएफ जमा होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेबाबत (EPFO) तुमच्या कानावर अनेक बातम्या आल्या असतील. केंद्र सरकार लवकरच EPFO ३.० लाँच करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी अनेक नवीन बदल होणार आहे. हैदराबादमध्ये तेलंगणा विभागीय कार्यालय आणि प्रादेशिक कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री बोलत होते.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया काय म्हणाले?
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी EPFO ३.० लाँच करण्याविषयी माहिती दिली. मांडविया म्हणाले की, सरकार EPFO मध्ये मोठे बदल करणार आहे. EPFO ३.० लाँच झाल्यानंतर ईपीएफओ सदस्यांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळतील. यानंतर त्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही.
एटीएम मशीनमधून काढता येणार पीएफचे पैसे
मांडविया म्हणाले की, येत्या काही दिवसांत EPFO ३.० आवृत्ती येईल. यापुढे पीएफ आणि ईपीएफओची सर्व कामे तुम्हाला सामान्य बँक व्यवहाराप्रमाणे करता येतील. तुमच्याकडे बँकेत व्यवहार करण्यासाठी खाते क्रमांक असतो. त्याचप्रणामे EPFO सदस्य त्यांच्या UAN द्वारे सर्व कामे करू शकतील. यामध्ये तुम्हाला सरकारी EPFO कार्यालयात जाण्याची गरज नाही. याशिवाय, तुम्हाला नियोक्त्याकडे जाण्याची गरजही लागणार नाही, हे पैसे तुमचे आहेत आणि तुम्हाला हवे तेव्हा ते घेऊ शकता. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री म्हणाले की, मी वचन देतो की येत्या काही दिवसांत तुम्हाला हवे तेव्हा एटीएममध्ये जाऊन तुमचे पैसे काढता येतील.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईपीएफओमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कमी होत असून सेवा वाढत आहेत. दरम्यान, मनसुख मांडविया यांनी निधी हस्तांफंड ट्रांसफर, क्लेम ट्रांसफर, नावात दुरुस्ती आणि कोणत्याही बँकेतून पेन्शन काढणे यासारख्या विविध सुधारणांचाही उल्लेख केला.