नवी दिल्ली : उद्योग समूहांना कर्जासाठी बनावट बँक हमी देण्याच्या आरोपाखाली ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील कंपनी ‘बिस्वल ट्रेडलिंक’च्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापे मारले. बिस्वल ट्रेडलिंकने रिलायन्स उद्योग समूहातील एका कंपनीला ६८ कोटी रुपयांची बनावट बँक हमी दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.
बिस्वल ट्रेडलिंक कंपनी आणि तिच्या संचालकांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या एका एफआयआरवरून ईडीने हा गुन्हा नोंदविला आहे.
ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, कंपनीच्या भुवनेश्वरमधील ३ ठिकाणांवर, तर कोलकत्यातील एका सहायक कंपनीच्या ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहेत. ही कंपनी बनावट बँक हमीसाठी ८ टक्के कमिशन घेत असे.
प्राप्त माहितीनुसार, रिलायन्स एनयू बीईएसएस लिमिटेड (रिलायन्स पॉवरची सहायक कंपनी) /महाराष्ट्र एनर्जी जनरेशन लिमिटेडच्या वतीने सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला (एसईसीआय) देण्यात आलेली ६८.२ कोटी रुपयांची बँक हमी बनावट असल्याचे आढळून आले आहे.