जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक मोठी बाब समोर आली आहे. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमॅन सॅक्सनं (Goldman Sachs) वर्ष २०२६ साठी भारताच्या विकासाचा अंदाज कमी केला असून, व्याजदर वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे. हा बदल महागाई आणि आर्थिक स्थितीबाबतच्या नवीन चिंता दर्शवतो. यामुळे लोकांच्या होम आणि कार लोनचा EMI वाढू शकतो आणि कर्ज घेणं महाग होऊ शकते. याचा परिणाम FD, RD सारख्या योजनांच्या व्याजदरांवरही होईल. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
विकास दराच्या अंदाजात मोठी कपात
गोल्डमॅन सॅक्सच्या मते, २०२६ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर आता ५.९% राहण्याचा अंदाज आहे, जो पूर्वी ७% वर्तवण्यात आला होता. याआधी मार्चमध्येही तो ६.५% पर्यंत कमी करण्यात आला होता, म्हणजेच विकास दराच्या अंदाजात सलग दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे.
एकही दिवस काम केलं नाही, तरीही सीईओला कंपनीनं दिलं १७० कोटींचं पॅकेज; कॉर्पोरेट जगतात खळबळ
कच्च्या तेलाच्या किमती ठरल्या मोठी चिंता
या घसरणीचं सर्वात मोठं कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती. पश्चिम आशियातील तणाव आणि पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे कच्चं तेल महाग होत आहे. मार्चमध्ये ब्रेंट क्रूड सरासरी १०५ डॉलर्स प्रति बॅरल राहिलं असून एप्रिलमध्ये ते ११५ डॉलर्स प्रति बॅरल पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. भारतासारख्या देशासाठी, जो तेलाचा मोठा आयातदार आहे, ही स्थिती महागाई आणि अर्थव्यवस्था या दोन्हीवर दबाव निर्माण करतं. २०२६ मध्ये आतापर्यंत भारतीय रुपयात सुमारे ४% घसरण झाली आहे. कमकुवत रुपया आयातीला महाग बनवतो, ज्यामुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो.
महागाई आणि व्याजदरांवर परिणाम
गोल्डमॅन सॅक्सनं २०२६ साठी महागाईचा अंदाज वाढवून ४.६% केला आहे. जरी हे आरबीआयच्या (RBI) २-६% च्या टार्गेटच्या मर्यादेत असला, तरी वाढती महागाई आणि कमकुवत रुपया पाहता, रिझर्व्ह बँक २०२६ मध्ये व्याजदरात ५० बेसिस पॉईंट (०.५०%) पर्यंत वाढ करू शकते.
EMI वर होणार परिणाम
व्याजदर वाढल्यामुळे सर्वात आधी तुमच्या EMI वर परिणाम होऊ शकतो. व्याजदर वाढताच होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन महाग होतात. बहुतेक कर्जे 'फ्लोटिंग रेट'वर असल्यानं तुमचा मासिक EMI देखील वाढतो. याचा थेट अर्थ असा की नवीन घर खरेदी करणं किंवा कर्ज घेणं कठीण होईल आणि ज्यांनी आधीच कर्ज घेतलं आहे, त्यांच्यावर महिन्याचा आर्थिक ताण वाढेल.
FD, RD सारख्या योजनांवरील व्याजदर वाढणार
दुसरा परिणाम तुमच्या बचतीवर पाहायला मिळेल. FD, RD आणि पोस्ट ऑफिस योजनांवरील व्याजदर वाढतील, ज्यामुळे परतावा थोडा चांगला मिळेल. परंतु, जर त्याच वेळी महागाई जास्त असेल, तर प्रत्यक्ष फायदा मर्यादितच राहतो.
नोकरी आणि कमाईवर परिणाम
तिसरा आणि सर्वात मोठा परिणाम नोकरी आणि कमाईवर होतो. जेव्हा कंपन्यांसाठी कर्ज महाग होतं, तेव्हा त्या नवीन प्रकल्प आणि भरती प्रक्रिया संथ करतात. याचा परिणाम पगारवाढ, बोनस आणि नोकरीच्या संधींवर स्पष्टपणे दिसून येतो. विशेषतः छोटे व्यवसाय आणि MSME क्षेत्रावर याचा जास्त दबाव पडतो. गुंतवणुकीचा विचार केल्यास, शेअर बाजार आणि रिअल इस्टेट दोन्हीमध्ये चढ-उतार वाढू शकतात. उच्च व्याजदरामुळे शेअर्स आणि प्रॉपर्टीची मागणी कमकुवत होऊ शकते.
चालू खात्यातील तूट वाढणार
रिपोर्टनुसार, भारताची चालू खात्यातील तूट २०२६ मध्ये GDP च्या २% पर्यंत पोहोचू शकते, जे अर्थव्यवस्थेसाठी आणखी एक आव्हान आहे. गोल्डमॅन सॅक्सचा अहवाल स्पष्ट करतो की जागतिक तणाव, महागडं तेल आणि कमकुवत रुपया मिळून भारताच्या विकासावर परिणाम करू शकतात. भारतीय अर्थव्यवस्था अजूनही मजबूत आहे, परंतु बाह्य दबाव वाढत आहेत. येणाऱ्या काळात महागाई, व्याजदर आणि रुपयाची हालचाल यावर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक असेल.
