- चंद्रकांत दडस
वरिष्ठ उपसंपादक
ध्याच्या महागाईच्या काळात कर्ज घेणे ही अपरिहार्यता झाली आहे. घराचे स्वप्न असो वा मुलांचे शिक्षण, बहुतेक जणांपुढे कर्जाशिवाय दुसरा पर्याय नसतो. कारण पगार रोजच्या गरजांसाठीच महिन्याच्या सुरुवातीलाच संपून जातो. त्यामुळे प्रत्येक महिन्याला आपल्या वाट्याला ईएमआय येतो. मात्र केवळ ईएमआय भरत राहणे आपल्याला सुरक्षित ठेवू शकत नाही. याउलट, एसआयपी म्हणजे नियमित गुंतवणुकीचा मार्ग आहे. यात धोका आहे, पण दीर्घकाळासाठी पाहिले
तर हीच गुंतवणूक भविष्यातील सुरक्षिततेची हमी ठरते.
आपल्याला शिकवण काय?
आपल्याला आपल्या जुन्या पिढीने एक संस्कार दिला आहे. जेवढे उरेल तेवढे साठवून ठेवा. पण आजच्या काळात हे समीकरण उलट आहे. त्यामुळे सर्वप्रथम बचत करा, मग उरलेले खर्च करा. कारण, गुंतवणुकीला मिळणाऱ्या चक्रवाढीचा परिणाम हा भविष्यात प्रचंड संपत्ती निर्माण करणारा ठरतो.
उदाहरण असे समजून घ्या...
दरमहा ५,००० एसआयपी, २० वर्षे, १२% परतावा असेल तर तुमच्याकडे ३५ लाखांहून अधिक निधी तयार होऊ शकतो. आणि हाच पैसा जर तुम्ही कर्जफेडीला वापरलात, तर केवळ व्याज वाचेल. मग प्रश्न उरतो, तुम्ही फक्त कर्जमुक्त होणार आहात की संपन्न होणार आहात?
योग्य संतुलन असे साधा...
यात कुठलाही टोकाचा मार्ग नाही. फक्त गुंतवणूक केली तर कर्ज वाढेल; फक्त ईएमआय भरला तर संपत्ती निर्माण होणार नाही. योग्य मार्ग म्हणजे दोन्ही एकत्र करणे. ईएमआय नियमित भरा, कारण कर्जमुक्त होणे आवश्यक आहे. पण त्याचवेळी थोडी रक्कम एसआयपीत गुंतवा, कारण भविष्यासाठी तयारी आवश्यक आहे. शेवटी काय तर ईएमआय तुम्हाला आज शांत झोप देतो.
पण एसआयपी तुम्हाला उद्या स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद देतो. प्रश्न इतकाच आहे की, तुम्ही आयुष्य फक्त कर्ज फेडण्यात घालवणार आहात, की संपत्ती निर्माण करून स्वप्ने पूर्ण करणार आहात?