तंत्रज्ञान, वाहन आणि अंतराळ क्षेत्रातील दिग्गज उद्योजक एलन मस्क यांनी सोमवारी नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांची एकूण संपत्ती ६०० अब्ज डॉलर्सचा (सुमारे ५० लाख कोटी रुपये) टप्पा ओलांडून $६७७ अब्जपर्यंत पोहोचली आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, इतकी प्रचंड संपत्ती जमा करणारे ते जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.
या अभूतपूर्व वाढीमागे मुख्यत्वे त्यांची खासगी अंतराळ कंपनी 'स्पेसएक्स' आहे. अलीकडेच स्पेसएक्सचे मूल्यांकन $८०० अब्जवर पोहोचले आहे, जे ऑगस्ट महिन्यातील $४०० अब्ज मूल्यांकनाच्या दुप्पट आहे. मस्क यांच्याकडे स्पेसएक्समध्ये सुमारे ४२% हिस्सा आहे. या मूल्यांकनातील वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत तब्बल $१६८ अब्जची भर पडली आहे. मस्क यांच्या संपत्तीत त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचा देखील मोठा वाटा आहे. टेस्लाचे शेअर्स यावर्षी १३% वाढले आहेत, ज्यामुळे मस्क यांच्या संपत्तीत आणखी वाढ झाली आहे.
आयपीओची तयारी
स्पेसएक्स २०२६ मध्ये आयपीओ आणण्याची योजना आखत आहे, जो इतिहासातील सर्वात मोठा लिस्टिंग ठरू शकतो. फोर्ब्सच्या अंदाजानुसार, मस्क आता जगातील पहिले ट्रिलियनेअर ($१००० अब्ज) बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात मस्क यांनी $५०० अब्जचा टप्पा ओलांडणारे पहिले व्यक्ती बनण्याचा विक्रम केला होता. यानंतर लगेचच दीड महिन्यात त्यांची संपत्ती १६८ अब्जांनी वाढली आहे.
