Elon Musk Tesla News: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्लानं नव्या सीईओचा शोध सुरू केल्याचं वृत्त आहे. ही बातमी येताच टेस्लाच्या शेअरमध्ये भूकंप आला आणि बुधवारी हा शेअर जवळपास ४ टक्क्यांनी घसरला. टेस्लाच्या शेअरची किंमत ३.३८ टक्क्यांनी घसरून २८२.१६ डॉलरवर बंद झाली. वॉल स्ट्रीट जर्नलनं दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीच्या संचालक मंडळानं सीईओ इलॉन मस्क यांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू केला आहे.
काय आहे अधिक माहिती?
रिपोर्टनुसार, अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) दिग्गज टेस्लाने सीईओ एलन मस्क यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी काही महिन्यांपूर्वी अनेक एक्झिक्युटिव्ह सर्च कंपन्यांशी संपर्क साधला होता. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, बोर्ड कोणत्या हेतूने हे पाऊल उचलत आहे याची माहिती सध्या देण्यात आलेली नाही. रिपोर्टनुसार, मस्क यांचा ट्रम्प प्रशासनाशी संबंध असल्यानं हे शक्य झालं असू शकतं.
रिपोर्टनुसार, ईव्ही कंपनीची विक्री आणि नफ्यात घट झाली आहे, तर अमेरिकन सरकारी एजन्सी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएंसीमध्ये (डीओजीई) मस्क यांच्या भूमिकेबद्दल गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. टेस्लाच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी मस्क यांची भेट घेऊन कंपनीला अधिक वेळ देण्याची विनंती केल्याचं अहवालात म्हटलं आहे. मात्र, मस्क यांनी गेल्या आठवड्यात ट्रम्प प्रशासनाला दिलेल्या वेळेत लक्षणीय कपात करणार असून आपल्या अनेक कंपन्या चालवण्यात अधिक वेळ घालवणार असल्याचं म्हटलं होतं.
DOGE म्हणजे काय?
फेडरल रोजगार कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएंसी (डीओजीई) या संस्थेच्या प्रमुख म्हणून त्यांच्या भूमिकेवर गुंतवणूकदारांनी टीका केली आहे. डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएंसीनं ट्रम्प प्रशासनाद्वारे फेडरल खर्चात कपात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांच्यातील चर्चेतून हे समोर आलंय आणि २० जानेवारी २०२५ रोजी एका कार्यकारी आदेशाद्वारे याची स्थापना करण्यात आली.