ED Action on Youtuber Anurag Dwiedi: उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्याचा रहिवासी असलेला कोट्यधीश युट्यूबर अनुराग द्विवेदी याच्यावर सक्तवसूली संचालनालयानं (ED) सोमवारी मोठी कारवाई केली. ईडीच्या कोलकाता विभागीय कार्यालयानं मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अंतर्गत अवैध ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगार प्रकरणात ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी दिल्ली, मुंबई, सुरत, लखनौ आणि वाराणसीमध्ये एकूण ९ ठिकाणी झडती घेतली. ही सर्व ठिकाणं सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अनुराग द्विवेदी आणि विविध ऑनलाइन गेमिंग व सट्टेबाजी ॲप्सशी संबंधित असल्याचं आढळली. या प्रकरणातील गुन्ह्यातील कमाई (POC) आणि मनी लाँड्रिंगमध्ये तो सामील असल्याचा संशय आहे.
झडतीदरम्यान ईडीनं अनुराग द्विवेदीच्या लँड रोव्हर डिफेंडर आणि BMW Z4 या दोन लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत. याशिवाय अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणंही जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वी १७ डिसेंबर रोजी ईडीनं लखनौ, उन्नाव आणि दिल्लीत द्विवेदीशी संबंधित १० ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यावेळी लॅम्बोर्गिनी उरूस, मर्सिडीज, फोर्ड एंडेव्हर आणि थार या चार महागड्या गाड्यांसह आक्षेपार्ह कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि सुमारे २० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.
ED, Kolkata Zonal Office has conducted search operations on 31.12.2025 and 01.01.2026 at 09 locations in Delhi, Mumbai, Surat, Lucknow and Varanasi at various premises linked to Social Media Influencer & Youtuber Anurag Dwivedi, and others in connection with an illegal online… pic.twitter.com/hnBpoznDpd
— ED (@dir_ed) January 5, 2026
३ कोटींची मालमत्ता गोठवली
तपासात दुबईमध्ये हवाला चॅनेलद्वारे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचे समोर आलं आहे. तसंच विमा पॉलिसी, मुदत ठेवी आणि बँक बॅलन्ससह सुमारे ३ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता PMLA कायद्याच्या कलम १७(१ए) अंतर्गत गोठवण्यात आली. पश्चिम बंगाल पोलिसांनी अवैध ऑनलाइन सट्टेबाजीबाबत नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीनं हा तपास सुरू केला होता. सिलिगुडी येथील सोनू कुमार ठाकूर आणि विशाल भारद्वाज हे आरोपी 'म्युल बँक' खात्यांद्वारे ऑनलाइन सट्टेबाजीचे रॅकेट चालवत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय.
दुबईत खरेदी केली मालमत्ता
ईडीच्या तपासात असंही आढळलं की, अनुराग द्विवेदीनं अवैध सट्टेबाजी प्लॅटफॉर्मचा सक्रियपणे प्रचार केला. त्यानं हवाला चॅनेल आणि म्युल खात्यांद्वारे पैसा मिळवला आणि त्याच पैशातून दुबईत स्थावर मालमत्ता खरेदी केली. अनुराग सध्या भारत सोडून दुबईत राहत असून ईडीनं अनेकवेळा समन्स बजावूनही तो तपासासाठी हजर झालेला नाही. या प्रकरणात ईडीनं यापूर्वी तीन आरोपींना अटक केली असून १ ऑगस्ट २०२५ रोजी कोलकाता येथील विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे २७ कोटी रुपयांची मालमत्ता फ्रीज/अटॅच करण्यात आली आहे.
९ वी नंतर सोडलं शिक्षण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुरागचं अभ्यासात मन लागत नव्हतं आणि त्याला क्रिकेटची आवड होती. त्यामुळेच त्यानं कमी वयात क्रिकेटची चांगली माहिती मिळवली होती. अभ्यासात रस नसल्यानं त्यानं क्रिकेटमध्ये सट्टेबाजी सुरू केली. १९ मार्च २०१६ रोजी सुरू झालेल्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान त्यानं पहिल्यांदा एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर भारत-पाकिस्तान सामन्यासाठी संघ बनवला आणि पहिल्याच सट्ट्यात तो हरला होता.
