L&T Chairman Salary: देशातील सर्वात मोठी इंजिनिअरिंग आणि पायाभूत सुविधा कंपनी लार्सन अँड टुब्रोचे (L&T) अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यन पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी त्यांचं चर्चेत येण्याचं कारण त्यांचं वक्तव्य नाही तर, त्यांच्या पगारातील वाढ आहे. त्यांच्या पगारात गेल्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) प्रचंड वाढ झाली आहे. या काळात त्यांना एकूण ७६.२५ कोटी रुपयं मानधन मिळालं, तर २०२३-२४ मध्ये त्यांना ५१.०५ कोटी रुपये मिळाले. या वाढीचं मुख्य कारण असं म्हटलं जातं की सुब्रमण्यन यांनी यावर्षी शेअर ऑप्शन्सचा (ESOPs) वापर केला, ज्याचं मूल्य १५.८८ कोटी रुपये होतं. गेल्या वर्षी त्यांनी कोणताही ESOP घेतला नाही.
सुब्रमण्यन यांनी अलीकडेच एका मुलाखतीत ९० तासांच्या कामाच्या आठवड्याबद्दल वक्तव्य केलं होतं तेव्हा ते चर्चेत आले होते. चांगले निकाल हवे असतील तर सर्वांनी रविवारीही काम केलं पाहिजे असंही ते म्हणाले. या विधानानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली आणि लोकांनी त्यांच्यावर टीका केली. नंतर, कंपनीनं यावर स्पष्टीकरणही दिलं होतं. अध्यक्षांचा अर्थ फक्त एवढाच होता की मोठी उद्दिष्टं साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणं आवश्यक असल्याचं नंतर कंपनीनं म्हटलं होतं.
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पगार अधिक
एल अँड टीच्या वार्षिक अहवालानुसार, कंपनीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पगारही खूप जास्त होते. कंपनीचे सीएफओ आर. शंकर रमण यांना २०२४-२५ मध्ये ३७.३३ कोटी रुपये मानधन मिळाले, तर उपव्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष सुब्रमण्यम सरमा यांना ४४.५५ कोटी रुपये देण्यात आले. या वर्षीच्या सॅलरी रिपोर्टमध्ये उच्च-स्तरीय कॉर्पोरेट नेत्यांना मोठे ESOP आणि परफॉर्मन्स बोनस कसे दिले जात आहेत हे दाखवलं आहे.
लार्सन अँड टुब्रोबद्दल
लार्सन अँड टुब्रो (L&T) ही भारतातील सर्वात मोठ्या अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी भारत आणि परदेशात अनेक मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प, वीज प्रकल्प, संरक्षण उपकरणं आणि तांत्रिक उपाय पुरवते. तिचं मुख्यालय मुंबईत आहे आणि ही कंपनी गेल्या अनेक दशकांपासून भारताच्या औद्योगिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.