Donald Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडवली आहे. त्यांनी भारतासह अनेक देशांवर जाचक कर लादले आहेत. भारतातून येणाऱ्या जनरिक औषधांवर त्यांनी 100 टक्के टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे भारतीय औषध उद्योगाला मोठा फटका बसण्याची भीती होती. मात्र, आता ट्रम्प यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा केला जात आहे.
भारतीय औषध उद्योगाला दिलासा
भारत हा जगातील सर्वात मोठ्या जनरिक औषध उत्पादक देशांपैकी एक आहे. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या जवळपास अर्ध्या जनरिक औषधांचा पुरवठा भारतातूनच होतो. जर 100% टॅरिफ लागू झाला असता, तर या औषधांच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाली असती, ज्याचा परिणाम थेट अमेरिकन नागरिकांवर आणि आरोग्य व्यवस्थेवर झाला असता. ट्रम्प यांच्या निर्णयाने आता दोन्ही देशांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या फायदा होईल.
भारताचा औषध निर्यातीत मजबूत वाटा
अमेरिकेला होणाऱ्या जनरिक औषधांच्या पुरवठ्यापैकी 47% भारतातून होतो. वित्तीय वर्ष 2025 मध्ये भारतीय फार्मा कंपन्यांचा निर्यात महसूल 30 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला असून, दरवर्षी सुमारे 31% वाढीचा दर कायम आहे. यावरुन स्पष्ट होते की, अमेरिकन बाजारपेठेत भारतीय औषधांची मागणी झपाट्याने वाढत आहे.
टॅरिफमुळे भारतीय कंपन्या चिंतेत...
जेव्हा ट्रम्प यांनी सोशल मीडियावरुन 100 टक्के टॅरिफची घोषणा केली, तेव्हा भारतीय फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. कारण, अमेरिकेत निर्यात होणाऱ्या औषधांवरील हा टॅरिफ थेट कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम करणार होता. मात्र, आता निर्णय मागे घेतल्याने पुन्हा शेअर बाजारात स्थिरता आणि गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे.
अमेरिकन नागरिकांनाही फायदा
अमेरिकन नागरिक डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि अँटिबायोटिक सारख्या औषधांसाठी भारतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. भारतातील औषधांमुळे त्यांना स्वस्त आणि दर्जेदार उपचार मिळतात. जर टॅरिफ लागू झाले असते, तर या औषधांच्या किंमती वाढल्या असत्या आणि सामान्य अमेरिकन नागरिकांवर त्याचा मोठा आर्थिक बोजा पडला असता.