Trump Tariff Warning : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताला सतत टॅरिफच्या धमक्या देत आहेत. आता तर त्यांनी थेट फार्मा क्षेत्राला लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या औषधांवर २५० टक्क्यांपर्यंत शुल्क (टॅरिफ) लावण्याची धमकी दिली आहे. या घोषणेचा तात्काळ परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला, जिथे फार्मा कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले. अजंता फार्मा, बायोकॉन ते झायडस पर्यंतच्या कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.
ट्रम्प यांची नवीन धमकी काय आहे?
ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकन औषध आयातीवर उच्च शुल्क लादण्याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, हा कर टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल. सुरुवातीला एक छोटासा कर लावला जाईल, त्यानंतर पुढील १८ महिन्यांत तो १५०% पर्यंत वाढवला जाईल आणि शेवटी २५०% पर्यंत पोहोचेल. अमेरिकेतील देशांतर्गत औषध उत्पादनाला चालना देणे हा यामागे उद्देश असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
भारतासाठी ही मोठी समस्या का?
अमेरिका हा औषधे आणि इतर औषध उत्पादनांचा एक मोठा आयातदार देश आहे. गेल्या वर्षी (२०२४ मध्ये) अमेरिकेची या क्षेत्रातील आयात २३४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. अमेरिकेच्या सर्वात मोठ्या पुरवठादारांमध्ये आयर्लंड, स्वित्झर्लंड, जर्मनी, इटली, चीन, ब्रिटन, जपान आणि भारताचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी अमेरिकेच्या एकूण औषध आयातीपैकी ६ टक्के आयात भारतातून झाली होती, ज्याचे मूल्य १३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होते. भारत आपल्या औषध उत्पादनांचा सर्वात मोठा भाग अमेरिकेला निर्यात करतो आणि तेथे भारतीय जेनेरिक औषधांना प्रचंड मागणी आहे. अशा परिस्थितीत, ट्रम्प यांच्याकडून लादले जाणारे हे प्रचंड शुल्क भारतीय फार्मा कंपन्यांसाठी एक मोठी अडचण निर्माण करू शकते.
घोषणा होताच शेअर बाजारात परिणाम
ट्रम्प यांच्या फार्मा क्षेत्रावरील करवाढीच्या धमकीचा तात्काळ परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसला. बाजारातील मंदीच्या काळात, सर्व प्रमुख भारतीय फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.
कंपनीचे नाव | घसरण | किंमत (रुपये) |
आरती फार्मा शेअर | ५.९५% | ८१८ |
दिवीज लॅब शेअर | ४.४५% | ६१२५ |
झायडस लाईफसायन्सेस | २.७५% | ९३४.९० |
आयपीसीए लॅब शेअर | २.६०% | १३९३ |
मॅनकाइंड फार्मा शेअर | २.२०% | २५६१ |
अॅबॉट इंडिया शेअर | १.८०% | ३२,७४० |
डॉ. रेड्डीज लॅब | १.५०% | ११९७.५० |
ग्लेनमार्क फार्मा | १.५०% | २००५.१० |
सन फार्मा : सुमारे २ टक्क्यांनी घसरून १६०० वर पोहोचला.
ग्लॅक्सो स्मिथक्लाइन फार्मा : ३ टक्क्यांहून अधिक घसरण.
अल्केम लॅब, टोरेंट फार्मा, सिप्ला, ल्युपिन : या कंपन्यांचे शेअर्सही १ ते १.५० टक्क्यांनी घसरले.
वाचा - जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
यामुळे भारतीय फार्मा उद्योगावर मोठे आर्थिक संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.