donald trump : नवीन वर्षात डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत. मात्र, खुर्चीवर बसण्याआधीच ट्रम्प यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी भारतावर रेसिप्रोकल कर लादण्याची धमकी दिली आहे. भारत अमेरिकन उत्पादनांवर जो कर लावतो, तोच कर आम्ही भारतीय उत्पादनांवरही लावू, असे त्यांचे म्हणणे आहे. ट्रम्प दीर्घकाळापासून काही अमेरिकन उत्पादनांच्या आयातीवर भारताने "उच्च शुल्क" लादण्यास विरोध करत आहेत. याला विरोध म्हणून आता भारतीय उत्पादनांवर शुल्क वाढवण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
काय म्हणाले ट्रम्प?
मीडियाशी बोलताना ट्रम्प म्हणाले, 'जर त्यांनी आमच्यावर उच्च शुल्क लादले तर आम्हीही त्यांच्यावर लादू. ते जवळजवळ सर्व प्रकरणांमध्ये आमच्यावर कर लावतात, पण, आम्ही सर्व आयातीवर कर लादला नाही. मात्र, आता पॉलिसी बदलावी लागणार आहे. पुढे ते म्हणाले, 'भारताने आमच्यावर १०० टक्के कर लावला तर आम्ही त्यांच्यावर अजिबात कर लावू नये का?' भारत आणि ब्राझील हे असे देश आहेत, जे काही अमेरिकन उत्पादनांवर उच्च शुल्क लावतात. या देशांनी जर त्यांच्या करात बदल केला नाही तर आम्हीही तेवढाच कर लादू असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
ट्रम्प यांच्या वाणिज्य सचिवांनी दिला पाठिंबा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचं समर्थन पुढील वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी केलं आहे. ते म्हणाले, 'ट्रम्प सरकारमध्ये रिसिप्रोसिटी हा महत्त्वाचा विषय असेल. तुम्ही आमच्याशी जसे वागाल तशीच वागणूक तुम्हालाही मिळेल. लुटनिक म्हणाले, आता आम्ही जशास तसे वागणार आहोत.
यापूर्वीही दिली होती धमकी
अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स चलन स्वीकारणाऱ्या देशांवर १०० टक्के शुल्क लागू करणार असल्याचे सांगितले होते. २००९ मध्ये स्थापन झालेल्या BRICS हा एकमेव मोठा आंतरराष्ट्रीय गट आहे, ज्याचा अमेरिका भाग नाही. या गटात दक्षिण आफ्रिका, इराण, इजिप्त, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) आहेत. गेल्या काही वर्षांपासून, त्याचे काही सदस्य देश, विशेषत: रशिया आणि चीन, अमेरिकन डॉलरला पर्याय शोधत आहेत. त्यांचे स्वतःचे ब्रिक्स चलन तयार करत आहेत. ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना अशा पावलाविरोधात इशारा दिला होता.