lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशांतर्गत स्टीलच्या दरात होतेय घसरण

देशांतर्गत स्टीलच्या दरात होतेय घसरण

आयात वाढणार : सीमा शुल्क कपातीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 05:19 AM2021-03-12T05:19:35+5:302021-03-12T05:20:21+5:30

आयात वाढणार : सीमा शुल्क कपातीचा परिणाम

Domestic steel prices are falling | देशांतर्गत स्टीलच्या दरात होतेय घसरण

देशांतर्गत स्टीलच्या दरात होतेय घसरण

Highlightsअर्थसंकल्पात स्टीलवरील सीमा शुल्क व आयात शुल्क सवलत १२.५ टक्क्यांवरून ७.५ टक्के करण्यात आले आहे. १ एप्रिलपासून ही सवलत लागू हाेणार आहे.

अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : केंद्र शासनाने एप्रिलपासून स्टीलच्या सीमा शुल्कात कपात केल्याने चीन व इंडोनेशियामधून स्टील आयातीसाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग सुरू झाले आहे. त्यातच देशांतर्गत मागणीतही घट झाल्याने स्टीलच्या दरात गेल्या दीड महिन्यात ५ ते ६.५ टक्के घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मते एप्रिलमध्ये दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पात स्टीलवरील सीमा शुल्क व आयात शुल्क सवलत १२.५ टक्क्यांवरून ७.५ टक्के करण्यात आले आहे. १ एप्रिलपासून ही सवलत लागू हाेणार आहे. त्यामुळे स्टील उद्योजकांनी आयातीसाठी बुकिंग सुरू केले आहे. हे स्टील आल्यास देशांतर्गत दराशी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे पुरवठादारांनी दरात कपात केली आहे. जानेवारीच्या तुलनेत मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात माइल्ड व स्टेनलेस स्टीलच्या दरात ५ ते ६.५ टक्के घट झाली आहे. पुढील महिन्यात दरात आणखी घसरण होणार  आहे. 
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत गत वर्षाच्या तुलनेत स्टील आयात ४१.८ टक्क्यांनी घटली होती. याउलट निर्यातीत २७.५ टक्के वाढ होती. भारतीय उत्पादकांना चांगला दर मिळत असल्याने निर्यात वाढली. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पहिल्या नऊ महिन्यांत स्टीलचे दर वाढत गेले. आता स्टीलची आयात वाढण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिलपासून त्यात मोठी वाढ होईल. चीन व इंडोनेशिया येथून आयात होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत दरावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे.

असे घटले दर (प्रतिकिलो)
प्रकार     जानेवारी २१    मार्च २१ 
माइल्ड स्टील    ६३ ते ६४    ६० ते ६१ 
स्टेनलेस स्टील      २२३            २१० 

स्टीलच्या दरात घट होत आहे. इंधनाचे दर कमी झाले, तर दरावर आणखी परिणाम दिसून येईल. केंद्र शासनाने कमी केलेल्या सीमा शुल्काचा परिणाम दरावर दिसत आहे. त्यामुळे स्टील आयातीसाठी बुकिंग वाढत आहे.                                           - संजय खांबे, स्टील उद्योजक, सांगली

Web Title: Domestic steel prices are falling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.