Dollar vs Rupee: गेल्या आठवड्यात परकीय चलन बाजारात जे काही घडलं, त्यानं गुंतवणूकदारांपासून सामान्य माणसापर्यंत सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. आठवड्याच्या सुरुवातीला जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया ९१ च्या पार घसरला, तेव्हा तो केवळ एक आकडा नव्हता, तर महागडी आयात, वाढती महागाई आणि कमकुवत होत चाललेल्या अर्थव्यवस्थेच्या भीतीचा संकेत मानला जाऊ लागला. बाजारपेठेत अस्वस्थता वाढली, व्यापारी सतर्क झाले आणि गुंतवणूकदारांच्या नजरा थेट भारतीय रिझर्व्ह बँकेवर (RBI) टिकल्या. त्यानंतर शुक्रवारी मात्र परिस्थितीनं अशी काही बदलली की संपूर्ण चित्रच बदलून गेलं.
रुपयाची ऐतिहासिक भरारी
आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी रुपयानं जोरदार पुनरागमन करत डॉलरच्या तुलनेत सुमारे २% मजबूती दर्शवली. ही गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठी एका दिवसातील सुधारणा मानली जात आहे. शुक्रवारी रुपया ८९.२७ च्या पातळीवर बंद झाला, जो आदल्या दिवसाच्या तुलनेत १.१% ची मोठी झेप आहे. काही तासांपूर्वी ९१ च्या पार कमकुवत दिसणारा रुपया पुन्हा एकदा सावरलेला दिसला. या रिकव्हरीमागील सर्वात मोठं कारण आरबीआयची आक्रमक भूमिका हे होतं.
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
आरबीआयची कारवाई आणि सुधारणेचे कारण
मध्यवर्ती बँकेने सरकारी बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर डॉलर्सची विक्री केली, ज्यामुळे रुपयाविरुद्ध एकतर्फी सट्टेबाजी करणं आता सोपं नाही, असा स्पष्ट संदेश बाजारपेठेत गेला. या पावलाचा परिणाम इतका वेगवान होता की, अवघ्या तीन मिनिटांत रुपया ८९.२५ च्या उच्च पातळीवर पोहोचला. अलीकडच्या वर्षांत इतकी वेगवान आणि निर्णायक सुधारणा क्वचितच पाहायला मिळाली आहे. प्रत्यक्षात, बाजारातील काही सट्टेबाजांनी रुपया आणखी कमकुवत होईल या आशेने मोठी पोझिशन घेतली होती. आरबीआयचा उद्देश या पोझिशन्स तोडण्याचा होता.
बुधवारीही रिझर्व्ह बँकेनं हस्तक्षेप केला होता, परंतु शुक्रवारच्या कारवाईनं सट्टेबाजांची रणनीती पूर्णपणे उलटवून लावली. यासोबतच आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचं विधानही महत्त्वाचे ठरले, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की बँकेनं रुपयासाठी कोणतीही 'टारगेट लेव्हल' निश्चित केलेली नाही. यामुळे आरबीआय गरजेनुसार हस्तक्षेप करेल, पण बाजारातील शक्तींनाही त्यांचं काम करू देईल, असे संकेत मिळाले.
परकीय गुंतवणूकदारांचा बदललेला कल आणि पुढील वाटचाल
रुपयाच्या मजबुतीमागे परकीय गुंतवणूकदारांचा बदललेला कल हे देखील एक महत्त्वाचं कारण ठरलं. दीर्घकाळ विक्री करणाऱ्या परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात खरेदी केली आहे, जे अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक मानलं जात आहे. भविष्यातील वाटचालीबद्दल बोलायचं झाल्यास, बाजार विश्लेषकांचे असे मत आहे की आरबीआयच्या सक्रिय उपस्थितीमुळे नजीकच्या भविष्यात रुपयामध्ये मोठी चढ-उतार होण्याची शक्यता कमी आहे. सध्या ८९.२५ ची पातळी आधार म्हणून आणि ८९.९० च्या आसपासची पातळी महत्त्वाची वरची सीमा मानली जात आहे.
