Personal Loan Prepayment Affect on Credit Score: कोणत्याही व्यक्तीला पैशांची गरज कधीही पडू शकते. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाकडे आपत्कालीन निधी असणं आवश्यक आहे. मात्र, ज्यांच्याकडे हा निधी नसतो, ती लोक आपली गरज पूर्ण करण्यासाठी बँकेकडून पर्सनल लोन घेतात. पर्सनल लोन हे असुरक्षित कर्ज (Unsecured Loan) असते. त्यामुळे या कर्जाचे व्याजदर खूप जास्त असतात. म्हणून, पर्सनल लोन विचारपूर्वक घेतलं पाहिजे.
अनेकदा पर्सनल लोन घेतल्यानंतर काही लोक ते लवकर बंद करण्यासाठी प्रीपेमेंट करतात. यामध्ये ते कर्जाची उर्वरित रक्कम बँकेला एकाच वेळी भरतात. कर्जाचे प्रीपेमेंट केल्यास बँक यासाठी वेगळं शुल्क आकारते, परंतु हे शुल्क कर्जाच्या व्याजापेक्षा खूपच कमी असते. त्यामुळे कोणत्याही कर्जाचे प्रीपेमेंट करणं हा एक चांगला पर्याय मानला जातो, कारण यामुळे मोठ्या प्रमाणात व्याजाची बचत होते. पण आता प्रश्न येतो की, कर्जाचे प्रीपेमेंट केल्यावर क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होतो? आज आपण याचबद्दल माहिती घेणार आहोत.
वर्षात किती वेळा करू शकता मोफत उपचार? कशी तपासाल तुमची पात्रता
क्रेडिट स्कोअर कमी होतो का?
पर्सनल लोनचं प्रीपेमेंट केल्याने क्रेडिट स्कोअरवर सकारात्मक (Positive) परिणाम होईल की नकारात्मक (Negative) परिणाम, हे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळे असू शकते. जेव्हा तुम्ही कर्ज घेता आणि तुमचे सर्व ईएमआय वेळेवर भरता, तेव्हा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर खूप चांगला परिणाम होतो. यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री दीर्घ काळासाठी होते आणि तुमचा क्रेडिट रिपोर्ट मजबूत होतो, ज्यामुळे क्रेडिट स्कोअर खूप चांगला होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दीर्घ कालावधीनंतर कर्जाचं प्रीपेमेंट करून तुमचं कर्ज बंद केलं, तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही आणि दीर्घ कालावधीत तुमचा क्रेडिट स्कोअर खूप चांगला होतो.
क्रेडिट स्कोअरवर कधी होतो परिणाम?
कर्जाचे प्रीपेमेंट केल्यावर क्रेडिट स्कोअरवर चुकीचा परिणाम तेव्हा होतो, जेव्हा तुम्ही तुमचे कर्ज खूप लवकर बंद करता. असं केल्यास क्रेडिट हिस्ट्री छोटी होते आणि अॅक्टिव्ह क्रेडिट मिक्स (Active Credit Mix) देखील कमी होतो. क्रेडिट ब्युरो (Credit Bureau) या गोष्टीकडे थोडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. क्रेडिट हिस्ट्री छोटी झाल्यामुळे अशा परिस्थितीत क्रेडिट स्कोअरमध्ये किरकोळ घट दिसून येऊ शकते.
