Aniruddha Malpani On Zerodha: मुंबईतील एक सुप्रसिद्ध डॉक्टर आणि गुंतवणूकदार डॉ. अनिरुद्ध मालपाणी हे अलीकडेच सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांनी देशातील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन ब्रोकरेज कंपनी असलेल्या झिरोदावर (Zerodha) गंभीर आरोप केले आहेत. कंपनीनं त्यांना त्यांचे स्वतःचे पैसे काढू दिले नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे.
डॉ. मालपाणी यांच्या डीमॅट खात्यात सुमारे ४३ कोटी रुपये जमा होते. यापैकी अंदाजे २५ कोटी रुपये ट्रेडिंगमध्ये गुंतलेले होते, तर १८ कोटींहून अधिक रक्कम काढण्यासाठी (फ्री) उपलब्ध होती. त्यांनी आपल्या खात्यातून ५ कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काढू शकले नाहीत.
डॉ. मालपाणी यांचा आरोप
डॉ. मालपाणी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर आपल्या झिरोदा खात्याचा स्क्रीनशॉट शेअर केलाय. “हा आहे झिरोदाचा स्कॅम! माझ्या स्वतःच्या कमाईचे पैसे मला काढू देत नाहीत. एका दिवसात ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त काढता येत नाहीत, असं ते म्हणतात. माझा पैसा फुकट वापरत आहेत,” असं त्यांनी यात नमूद केलंय. त्यांनी झिरोदाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांना टॅग करून यावर उत्तर मागितलं.
झिरोदाचं स्पष्टीकरण
झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी यावर तातडीनं प्रतिक्रिया दिली. डॉ. मालपाणी यांचं पेमेंट प्रोसेस करण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं. कामथ यांनी स्पष्ट केलं की, सुरक्षितता आणि सिस्टीमची स्थिरता राखण्यासाठी ५ कोटी रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली आहे, जेणेकरून कोणतीही चुकीची देवाणघेवाण किंवा फसवणूक होऊ नये. पैसे एकदा काढले गेल्यास ते परत मिळणं जवळजवळ अशक्य होतं, म्हणून प्रत्येक वित्तीय संस्थेला काही मर्यादा ठेवाव्या लागतात, असं त्यांचं म्हणणं होतं.
The Zerodha scam !
— Dr Aniruddha Malpani, MD (@malpani) November 3, 2025
They don't allow me to withdraw my own money from their account ,saying the daily limit for withdrawal is Rs 5 crores . They use my money for free !@zerodhaonline
This is unfair @nikhilkamathciopic.twitter.com/QgEborsDxP
सोशल मीडिया आणि तज्ज्ञांची प्रतिक्रिया
हा प्रकार सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. काही लोकांनी मालपाणी यांना एवढी मोठी रक्कम डिस्काउंट ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर का ठेवली, असा प्रश्न विचारला. तर काहींनी इतकी संवेदनशील माहिती सार्वजनिकपणे शेअर करणं सुरक्षित नसल्याचा सल्ला दिला.
यादरम्यान, टॅक्स कॉम्पासचे संस्थापक आणि टॅक्स तज्ज्ञ अजय रोटी यांनी यावर आपलं मत मांडलं. त्यांनी सांगितले की, "हा कोणताही स्कॅम नाही, तर ती सुरक्षा पॉलिसी आहे. मी अशा ब्रोकरसोबत काम करायला प्राधान्य देईन जो सुरक्षेच्या मर्यादा ठेवतो, जेणेकरून कोणीही माझे पैसे एकाच दिवसात उडवू शकणार नाही," असे ते म्हणाले. बँक आणि UPI सारख्या सिस्टीममध्येही डेली ट्रान्सफरसाठी मर्यादा असते, ज्यामुळे मोठी चूक किंवा फसवणूक टाळता येते, असंही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. अनिरुद्ध मालपाणी कोण आहेत?
डॉ. अनिरुद्ध मालपाणी हे पेशानं आयव्हीएफ (IVF) स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी १९९१ मध्ये मुंबईत मालपाणी इनफर्टिलिटी क्लिनिकची स्थापना केली. डॉक्टर असण्यासोबतच ते एक एंजल इनव्हेस्टरदेखील (Angel Investor) आहेत. त्यांनी आतापर्यंत ३० हून अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून, त्यांची गुंतवणूक हेल्थकेअर, टेक्नॉलॉजी आणि इतर क्षेत्रांमध्ये आहे. नुकतेच त्यांनी Nexxio नावाच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे.
