Firecracker Insurance : दरवर्षी दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी होते, पण याच काळात भाजणे किंवा घरात आग लागणे अशा अपघातांच्या बातम्याही समोर येतात. फायर सर्व्हिसनुसार, गेल्या दिवाळीत (२०२४) अग्निशमन आणि आपत्कालीन कॉलमध्ये ५३% वाढ झाली होती. या घटना लक्षात घेऊन आता फिनटेक कंपन्या 'मायक्रो इन्शुरन्स' घेऊन पुढे येत आहेत. फोनपे पाठोपाठ आता कव्हरशुअर या होमग्रोन इन्शुरटेक कंपनीने खास दिवाळीसाठी 'फटाका इन्शुरन्स' योजना आणली आहे.
CoverSure चा ५ रुपयांचा प्लॅन : ५०,००० पर्यंत कव्हरेज
फटाक्यांमुळे होणारे अपघात आणि नुकसानीचा धोका लक्षात घेऊन, CoverSure ने आपला 'फटाका इन्शुरन्स' प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची किंमत केवळ ५ रुपये असून तो १० दिवसांसाठी कव्हरेज देतो. यात अपघाती मृत्यू झाल्यास ५०,००० रुपयांपर्यंत कव्हरेज मिळेल. तसेच भाजणे किंवा किरकोळ जखम झाल्यास १०,००० रुपयांपर्यंत कव्हरेज मिळेल. CoverSure च्या ॲप किंवा वेबसाइटवरून काही क्लिक्समध्ये डिजिटल पद्धतीने ही पॉलिसी खरेदी करता येते आणि ती त्वरित ॲक्टिव्हेट होते.
CoverSure चे संस्थापक आणि सीईओ सौरभ विजयवर्गीय यांच्या मते, "दिवाळी हा आनंदाचा सण आहे, पण एक छोटीशी चूक आयुष्य बदलू शकते. हा इन्शुरन्स लोकांना सुरक्षितपणे उत्सव साजरा करण्याचा आत्मविश्वास देतो."
फोनपेचा ११ रुपयांचा फेस्टिव्ह कव्हर
याआधी PhonePe नेही आपला ११ रुपये (जीएसटीसह) किंमतीचा 'फटाका इन्शुरन्स' प्लॅन पुन्हा लॉन्च केला आहे. या पॉलिसीमध्ये २५,००० रुपयांपर्यंतचा विमा कव्हर मिळतो. या प्लॅनमध्ये स्वतःसह पती/पत्नी आणि दोन मुलांसह संपूर्ण कुटुंबाला कव्हर मिळते. हा प्लॅन ११ दिवसांसाठी वैध असतो. उदा. जर १२ ऑक्टोबरला खरेदी केला तर तो २३ ऑक्टोबरपर्यंत मान्य राहील. यात हॉस्पिटलायझेशन, डे-केअर उपचार आणि अपघाती मृत्यू यांसारख्या सुविधा समाविष्ट आहेत.
वाचा - रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
असा विमा का आहे आवश्यक?
दरवर्षी दिवाळीत देशभरात १००० हून अधिक लोक फटाक्यांमुळे जखमी होतात आणि उपचारांचा खर्च २५,००० रुपये ते १ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. अशा वेळी, ज्या कुटुंबांकडे आरोग्य किंवा अपघात विमा नाही, त्यांच्यासाठी हे मायक्रो इन्शुरन्स प्लॅन कमी पैशात सुरक्षेची मोठी ढाल ठरतात. फक्त ५ ते ११ रुपयांमध्ये मिळणारा हा कव्हर अपघातामुळे येणारा अनपेक्षित आर्थिक ताण कमी करण्यास मदत करतो.