Digital Safety Rules : आजच्या काळात भाजीपाल्यापासून ते मोठ्या शॉपिंगपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण 'युपीआय'चा वापर करतो. व्यवहार जलद होतात हे खरे, पण याच वेगामुळे आपण अनेकदा बेसावध होतो. सायबर गुन्हेगार आज बँकिंग सिस्टिम हॅक करत नाहीत, तर तुमच्या घाईचा आणि तांत्रिक अज्ञानाचा फायदा घेतात. म्हणूनच, प्रत्येक कुटुंबाने आता स्वतःचे 'डिजिटल सुरक्षा नियम' बनवणे काळाची गरज बनली आहे.
चूक प्रणालीत नाही, आपल्या सवयींमध्ये आहे!
युपीआय प्रणाली सुरक्षित आहे, पण सायबर ठग 'कलेक्ट रिक्वेस्ट' नावाच्या सुविधेचा गैरवापर करतात. समोरची व्यक्ती "मी तुम्हाला पैसे पाठवतोय" असे सांगते आणि तुमच्या ॲपवर एक रिक्वेस्ट पाठवते. घाईघाईत आपण ती रिक्वेस्ट अप्रूव करतो आणि पैसे येण्याऐवजी आपल्याच खात्यातून कट होतात. लक्षात ठेवा, पैसे स्वीकारण्यासाठी कधीही पिन टाकण्याची किंवा रिक्वेस्ट अप्रूव करण्याची गरज नसते.
QR कोड आणि बनावट लिंक्सचा सापळा
अनेकदा फसवणूक करणारे बनावट क्यूआर कोड पाठवतात. स्कॅन केल्यानंतर पेमेंट करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचे नाव आणि रक्कम नीट तपासा. घाईत 'Pay' बटण दाबणे महाग पडू शकते.
गुगलवर सर्च करून मिळालेले कस्टमर केअर नंबर अनेकदा बनावट असू शकतात. तक्रार करण्यासाठी नेहमी अधिकृत बँकेच्या ॲपचाच वापर करा. अनोळखी व्यक्तीने सांगितलेले स्क्रीन शेअरिंग ॲप (उदा. AnyDesk किंवा TeamViewer) कधीही डाऊनलोड करू नका.
घराघरांत 'डिजिटल शिस्त' हवी!
घरातील ज्येष्ठ नागरिक आणि मुलेही आता युपीआय वापरत आहेत, मात्र त्यांची तांत्रिक समज मर्यादित असू शकते. अशा वेळी कुटुंबासाठी काही नियम ठरवा.
- कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
- ओटीपी किंवा युपीआय पिन कोणालाही सांगू नका.
- संशयास्पद वाटल्यास घरातील जबाबदार व्यक्तीला विचारल्याशिवाय व्यवहार करू नका.
सुरक्षित राहण्यासाठी सोप्या टिप्स
- दैनंदिन खर्चासाठी एक वेगळे बँक खाते ठेवा आणि त्यात कमी बॅलन्स ठेवा. मोठ्या बचतीचे खाते युपीआयशी जोडू नका.
- बँकेच्या ॲपमधून रोजच्या व्यवहारांची मर्यादा ठरवून घ्या.
- प्रत्येक व्यवहाराचा मेसेज आणि नोटिफिकेशन तात्काळ मिळण्यासाठी सेटिंग तपासा.
- फोनला आणि युपीआय ॲपला वेगवेगळे आणि कठीण पासवर्ड किंवा बायोमेट्रिक लॉक ठेवा.
वाचा - वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
'पे' बटण दाबण्यापूर्वी एक सेकंद थांबा!
ठग नेहमी तुम्हाला घाई करतात. "ऑफर संपेल" किंवा "लवकर पेमेंट करा" असा दबाव टाकला जात असेल, तर समजा काहीतरी गडबड आहे. शांत डोक्याने व्यवहार करणे, क्यूआर कोड स्कॅन केल्यावर नाव तपासणे ही तुमची सर्वात मोठी सुरक्षा आहे.
