Post Office PPF Scheme: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ (PPF) ही एक जुनी आणि खूप जास्त पसंत केली जाणारी बचत योजना आहे. ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जात आहे. पीपीएफ योजनेवर सध्या वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळत आहे.
पीपीएफ योजनेअंतर्गत तुम्हाला एका वर्षात कमीतकमी एकदा पैसे जमा करावे लागतात. तुम्ही हवं असल्यास पीपीएफ खात्यात दरवर्षी एकदाच मोठी रक्कम (एकरकमी) जमा करू शकता किंवा जास्तीत जास्त १२ हप्त्यांमध्ये पैसे जमा करू शकता. पीपीएफ खात्यात एका वर्षात कमीतकमी ₹५०० आणि जास्तीत जास्त ₹१.५० लाख जमा करता येतात. जर तुम्ही हप्त्यांमध्ये पैसे जमा करत असाल, तर तुम्ही अगदी ₹५० चाही हप्ता बनवू शकता.
१५ वर्षांत होते पीपीएफ खातं मॅच्युअर
पीपीएफ खातं १५ वर्षांत मॅच्युअर होतं. पण, तुम्हाला हवं असल्यास एक फॉर्म भरून ते पुढील ५-५ वर्षांसाठी वाढवू शकता. पीपीएफ खातं कोणत्याही बँकेत उघडता येतं. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येही (Post Office) जाऊन देखील पीपीएफ खातं उघडू शकता.
जर तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यात दरमहा ₹५,००० जमा करत असाल, तर तुमची वार्षिक गुंतवणूक ₹६०,००० होईल. पीपीएफ योजनेत वार्षिक ₹६०,००० ची गुंतवणूक केल्यास, १५ वर्षांनंतर म्हणजेच मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण ₹१६,२७,२८४ मिळतील. यामध्ये तुमची गुंतवणूक केलेली रक्कम ₹९,००,००० आणि व्याज म्हणून मिळालेले ₹७,२७,२८४ समाविष्ट आहेत.
पीपीएफ खात्यावर मिळते कर्जाची सुविधा
पीपीएफ खात्याबद्दल तुम्हाला एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही एका वर्षात कमीतकमी ₹५०० देखील जमा केले नाहीत, तर तुमचे खातं बंद केलं जाईल. मात्र, दंड भरून ते पुन्हा अॅक्टिव्ह करता येतं. पीपीएफ खात्यासोबत तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळते. आम्ही सांगितल्याप्रमाणे, पीपीएफ एक सरकारी योजना आहे. त्यामुळे, या खात्यात जमा केलेला तुमचा प्रत्येक पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे. पीपीएफ खाते उघडल्यानंतर तुम्ही ५ वर्षांपूर्वी पैसे काढू शकत नाही. ५ वर्षांनंतर काही विशेष परिस्थितीत, जसं की, गंभीर आजार, मुलांचं शिक्षण, पीपीएफ खात्यातून पैसे काढता येतात.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
