उद्या म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी स्विगी (Swiggy), झोमॅटो (Zomato), ब्लिंकिट (Blinkit) आणि झेप्टो (Zepto) यांसारख्या कंपन्यांचे डिलिव्हरी करणारे गिग वर्कर्स संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीच्या दिवशी ऑर्डर्सची संख्या प्रचंड असते, अशा वेळी हे कर्मचारी कामावर न आल्यास या ऑनलाईन कंपन्यांना एकाच दिवसात कोट्यवधी रुपयांचं नुकसान सहन करावं लागू शकतं. कमी वेतन, कामाचा वाढता ताण आणि सुरक्षेचा अभाव या तक्रारींमुळे डिलिव्हरी बॉईडनं ३१ डिसेंबरला काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय होईलच, पण कंपन्यांच्या कमाईलाही फटका बसेल.
स्विगी आणि झोमॅटोच्या उत्पन्नावर होणारा परिणाम
स्विगी या मोठ्या फूड डिलिव्हरी कंपनीची वार्षिक कमाई सुमारे १५,२२७ कोटी रुपये आहे, ज्यानुसार सरासरी दररोज ४१.७ कोटी रुपयांची विक्री होते. कंपनी सध्या तोट्यात असून दर १०० रुपयांच्या कमाईवर २०.५ रुपये तोटा सोसत आहेत. संप झाल्यास संपूर्ण ४१.७ कोटी रुपयांची विक्री थांबेल, मात्र डिलिव्हरी आणि पॅकेजिंगचा खर्च वाचल्यामुळे स्विगीची सुमारे ८.५ कोटी रुपयांची बचत होईल. दुसरीकडे, झोमॅटोची वार्षिक कमाई अंदाजे १५,०३७ कोटी रुपये आहे, म्हणजेच दररोजची सरासरी ४१.२ कोटी रुपये. झोमॅटो सध्या नफ्यात असून दर १०० रुपयांमागे ३.५ रुपये नफा कमावते. संपामुळे विक्री गमावल्यास झोमॅटोला ४१.२ कोटींचे नुकसान होईल आणि नफ्यात १.४ कोटींची घट होईल.
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
ब्लिंकिट-जेप्टो या क्विक कॉमर्स कंपन्यांची स्थिती
झोमॅटोच्या मालकीची ब्लिंकिट ही कंपनी किराणा मालाची डिलिव्हरी करते. तिची वार्षिक कमाई ५,२०६ कोटी रुपये असून रोजची विक्री १४.३ कोटी रुपये आहे. ही कंपनी तोट्यात असून संपामुळे विक्री थांबल्यास तिचा तोटा १० लाख रुपयांनी कमी होऊ शकतो कारण काही खर्च वाचणार आहेत. झेप्टो या वेगानं वाढणाऱ्या कंपनीची वार्षिक कमाई ११,११० कोटी रुपये असून दररोजचा महसूल ३०.४ कोटी रुपये आहे. मात्र, झेप्टोचा तोटा मोठा असून ती दर १०० रुपयांवर ३०.३ रुपये नुकसान सोसत आहे. संपामुळे ३०.४ कोटींची विक्री थांबेल, पण खर्च वाचल्याने तोटा ९.२ कोटींनी कमी होऊ शकतो. झेप्टोसाठी चिंतेची बाब ही आहे की, डिलिव्हरी न मिळाल्यास ग्राहक इतर पर्यायांकडे वळू शकतात.
एकूण नुकसान आणि ग्राहकांचा अनुभव
या चारही कंपन्यांचा विचार केला तर एका दिवसात सुमारे १२७.६ कोटी रुपयांची विक्री ठप्प होऊ शकते. जरी तोट्यातील कंपन्यांना खर्च वाचल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ऑर्डर्सची संख्या नेहमीपेक्षा दोन-तीन पट जास्त असते, त्यामुळे प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा यापेक्षा मोठा असू शकतो. केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर या काळात ग्राहकांना होणारा त्रास आणि त्यांचा खराब अनुभव कंपन्यांच्या भविष्यातील प्रतिमेवर आणि व्यवसायावर मोठा परिणाम करू शकतो.
