रिलायन्स ब्रँड्स लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक दर्शन मेहता यांचं बुधवारी निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते. रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड हा मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग आहे. मुकेश अंबानी यांनी २००७ मध्ये रिलायन्स ब्रँड्सची सुरुवात केली होती. दर्शन मेहता तेव्हा पहिल्या कर्मचाऱ्यांपैकी एक होते. १७ वर्षे कंपनीचे एमडी राहिल्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली होती.
दर्शन मेहता हैदराबादमधील ताज हॉटेलमध्ये ट्रेडमिलवर व्यायाम करत होते, त्यावेळी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असलेले दर्शन मेहता रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये रुजू होण्यापूर्वी अरविंद ब्रँड्स लिमिटेडचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात अॅडव्हर्टायझिंगपासून केली होती. रिलायन्स ब्रँड्स ही समूहाची सर्वात यशस्वी उपकंपनी आहे. मुकेश अंबानी यांच्या कन्या ईशा अंबानी ही कंपनी सांभाळतात. दर्शन मेहता यांना ईशा अंबानी यांचा राईट हँड मानलं जायचं.
७०० हून अधिक स्टोअर्स
रिलायन्स ब्रँड्सची देशात ७०० हून अधिक स्टोअर्स आहेत. कंपनीत १० हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. या स्टोअर्समध्ये ८५ हून अधिक आंतरराष्ट्रीय ब्रँडची उत्पादनं आहेत. यामध्ये बर्बेरी, व्हॅलेंटिनो, वर्सेस, बोटेगा व्हेनेटा, बालेंसियागा, मार्क्स अँड स्पेन्सर, टिफनी अँड कंपनी, जिमी चू, प्रेट ए मॅंगर आणि पॉटरी बार्न यांचा समावेश आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ या नात्यानं दर्शन मेहता यांना एर्मेनेगिल्डो झेगना, ब्रुक्स ब्रदर्स आणि डिझेल सह टॉमी हिलफिगर, नॉटिकासारख्या ब्रँड्सना भारतात आणण्यामागे त्यांचा हात असल्याचं म्हटलं जातं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२०-२०२१ मध्ये दर्शन मेहता यांचं वार्षिक वेतन ४.८९ कोटी रुपये होते. त्यांना दररोज एक लाखाहून अधिक रुपये मिळत होते.