Cyber Security : गेल्या वर्षभरापासून आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात येत आहे. अशा परिस्थिती नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. एका अहवालानुसार, देशातील सुमारे ९० टक्के कंपन्या पुढील एका वर्षात सायबर सुरक्षा संबंधित नवीन पदे भरण्याची योजना आखत आहेत. सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आणि कंपनीचा महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी कंपन्यांना आता प्रशिक्षित व्यावसायिकांची तातडीने गरज भासत आहे.
रूब्रिक झिरो लॅब्सच्या अहवालानुसार, पुढील १२ महिन्यांमध्ये डिजिटल ओळख व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थापित करण्यासाठी समर्पित व्यावसायिकांना नियुक्त करण्याचा ९०% भारतीय संस्थांचा विचार आहे.
AI मुळे ओळख व्यवस्थापनाची वाढती गरज
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एआय-आधारित प्रणालींचा वापर कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे, आता केवळ मानवी ओळखच नाही, तर मशिन आणि सॉफ्टवेअरच्या ओळखीची संख्याही वेगाने वाढत आहे. 'आइडेंटिटी क्रायसिस' नावाच्या या अहवालानुसार, सायबर हल्ल्यांमुळे कंपन्यांचे तांत्रिक प्रमुख जसे की सीआयओ आणि सीआयएसओ आता ओळख-आधारित सायबर धोक्यांपासून बचाव करण्यावर त्वरित लक्ष केंद्रित करत आहेत. हा अहवाल वेकफिल्ड रिसर्चने ५०० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांमधील १,६२५ आयटी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे.
सायबर सुरक्षा नोकऱ्यांची वाढती मागणी
देशात डिजिटायझेशनला प्रोत्साहन मिळत असतानाच, त्यासोबत जोडलेले सायबर धोकेही वाढत आहेत. यामुळेच सायबर सुरक्षा क्षेत्रातील नोकऱ्यांची स्थिती सतत मजबूत होत आहे आणि या क्षेत्रात व्यावसायिकांची मागणी वाढत आहे. एका अंदाजानुसार, या क्षेत्रात लवकरच सुमारे ३५ लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. ही मागणी इतर क्षेत्रांच्या तुलनेत खूप वेगाने वाढत आहे. कंपन्या केवळ नवीन भरतीच नाही, तर कुशल व्यावसायिकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी चांगला पगार आणि मोठे फायदे देखील ऑफर करत आहेत.
कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध?
सायबर सिक्युरिटीचे शिक्षण आता विविध अभ्यासक्रमांमध्ये उपलब्ध आहे. बी.टेक सारख्या मागणी असलेल्या पदव्यांमध्येही आता सायबर सिक्युरिटीचा पर्याय दिला जात आहे. सायबर सिक्युरिटीमध्ये डिग्री घेतलेल्या तरुणांसाठी खालील भूमिकांमध्ये नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.
- सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट
- एथिकल हॅकर
- पेनेट्रेशन टेस्टर
- इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजर
वाचा - सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
याव्यतिरिक्त, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी इस्रो आणि डीआरडीओ सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्येही करिअरच्या संधी उपलब्ध असतील. तुमच्याकडे सायबर सुरक्षेची डिग्री असल्यास, रेझ्युमे तयार ठेवा आणि या संधींचा फायदा घ्या!
