S&P Global Report on Crude Oil:इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता जागतिक ऊर्जा बाजारावरही दिसू लागला आहे. S&P Global ने आपल्या ताज्या अहवालात इशारा दिला आहे की, इस्रायल-अमेरिका-इराण तणाव आणि मध्यपूर्वेतील संघर्ष जागतिक तेल पुरवठ्यासाठी मोठा अडथळा ठरू शकतो. अहवालात विशेषतः हॉर्मूज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) या महत्त्वाच्या समुद्री मार्गाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या मार्गावरून कच्च्या तेलाची वाहतूक कमी झाली किंवा पूर्णपणे थांबली, तर जागतिक ऊर्जा बाजारात गंभीर परिणाम होऊ शकतात.
हॉर्मूज मार्गावरील वाहतूक घटली
S&P Global च्या अहवालानुसार ‘Commodities at Sea’ या डेटाच्या आधारे १ मार्च रोजी फक्त पाच तेल टँकर हॉर्मूज सामुद्रधुनीतून गेले. सामान्य परिस्थितीत या मार्गावरून दररोज सरासरी ६० तेल टँकर जात असतात. त्यामुळे तेल पुरवठ्यातील ही घट चिंताजनक मानली जात आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, जर हॉर्मूज मार्गावरील वाहतुकीत एक आठवडा अडथळा कायम राहिला, तर तो जागतिक ऊर्जा इतिहासातील महत्त्वाच्या घटनांमध्ये गणला जाऊ शकतो.
...तर ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम
२०२६ च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत या सामुद्रधुनीतून दररोज सुमारे २.०८ कोटी बॅरल कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने वाहून नेण्यात आली. यापैकी सुमारे ८२ टक्के पुरवठा आशियाई बाजारपेठांमध्ये पोहोचला. S&P Global च्या मते, जर हॉर्मूज सामुद्रधुनी पूर्णपणे बंद झाली, तर जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे अनेक देशांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलरच्या पुढे जाऊ शकते
अहवालानुसार ज्या बाजारांमध्ये आधीच तेलाचा साठा कमी आहे, तिथे पुरवठ्यातील कमतरतेचा सर्वाधिक परिणाम दिसू शकतो. जर काही महिन्यांपर्यंत दररोज सुमारे ७० लाख बॅरल तेलाची कमतरता राहिली, तर मर्यादित पुरवठ्यामुळे मागणीवर दबाव वाढेल. परिणामी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलर किंवा त्याहून अधिक होऊ शकते. मात्र, परिस्थिती लवकर सामान्य झाली तर कच्च्या तेलाच्या किमती सुमारे ८० डॉलरच्या पातळीवर स्थिर राहू शकतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
