गुवाहाटी : आसामच्या दिब्रुगढ जिल्ह्यातील नामरूप बोरहाट-१ या विहिरीत हायड्रोकार्बन सापडले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री हिमांता बिस्व सर्मा यांनी दिली. या विहिरीत राज्य सरकारची लक्षणीय हिस्सेदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
हायड्रोकार्बन हे खनिज तेलाचे संयुग असून, त्यात हायड्रोजन आणि कार्बन यांचे अंश असतात. अशा विहिरींत खनिज तेल असू शकते. यामुळे खनिज तेल ड्रिलिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक शक्य होईल तसेच देश तेलाच्या बाबतीत काही प्रमाणात स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल.
पहिलेच राज्य ठरणार
या शोधामुळे आसाम सरकार थेट तेल उत्पादन करणारे पहिले राज्य सरकार ठरणार आहे. तेल संशोधनाचे प्रयत्न त्यामुळे यशस्वी झाले आहेत.
त्यातून आसामला महसूल आणि रॉयल्टी याद्वारे बळ मिळेल आणि देशाला तेलाचा स्थिर पुरवठा होईल.
हा राज्यासाठी एक गर्वाचा क्षण आहे, असे मुख्यमंत्री सर्मा म्हणाले.