Mobile Recharge Plans : देशातील कोट्यवधी मोबाइल युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायच्या म्हणण्यानुसार कंपन्यांना व्हॉईस आणि एसएमएस पॅक वेगळे द्यावे लागणार आहेत. यामुळे ग्राहकांना केवळ आवश्यक सेवेसाठी पैसे भरण्याचा पर्याय मिळणार आहे. तसंच एसटीव्ही म्हणजेच स्पेशल टॅरिफ व्हाउचरची मर्यादा ९० दिवसांवरून ३६५ दिवस करण्यात आली आहे. ट्रायच्या नव्या नियमांनुसार १० रुपयांचे टॉप अप व्हाउचर असणं आवश्यक आहे. सध्या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना कॉम्बो पॅक देतात. या नव्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा टूजी सिमकार्ड वापरणाऱ्यांना होणार आहे. आतापर्यंत ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोक टू-जी सिमकार्डचा वापर करत आहेत.
मोबाइल ऑपरेटर्स सध्या जे व्हॉईस आणि एसएमएस प्लान्स देत आहेत ते इंटरनेट / डेटाच्या किंमतींसह बंडल केलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य युजर्सना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. फीचर फोन वापरणारे अनेक ग्राहक तसंच ग्रामीण भागात राहणारे वृद्ध आणि अनेक ग्राहक इंटरनेट वापरत नाहीत. असं असूनही त्यांना डेटा पॅक घेण्याची सक्ती होत आहे. ट्रायनं यावर आक्षेप घेतला होता. मात्र, मोबाइल कंपन्यांना हे मान्य नव्हतं आणि यामुळे केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेचा वेग मंदावू शकतो, असं म्हटलं होतं.
काय होणार फायदा?
सध्याच्या डेटा-ओनली एसटीव्ही आणि बंडल ऑफरव्यतिरिक्त व्हॉईस तसंच एसएमएससाठी स्वतंत्र एसटीव्ही (Special Tariff Vouchers) अनिवार्य करण्यात यावं, असं प्राधिकरणाचं मत आहे, असं ट्रायनं म्हटलं. व्हॉईस आणि एसएमएस-ओनली एसटीव्ही अनिवार्य केल्यानं डेटाची गरज नसलेल्या ग्राहकांना पर्याय उपलब्ध होतील, असंही निदर्शनास आलं. याचा सरकारच्या डेटा इनक्युलजन उपक्रमावर परिणाम होणार नाही कारण सेवा पुरवठादारांना बंडल ऑफर आणि केवळ डेटा-ओनली व्हाउचर देण्याचे स्वातंत्र्य आहे.
सप्टेंबर-नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ग्राहक सर्वेक्षण केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रायनं म्हटलंय. टेलिकॉम ऑपरेटर्स, ग्राहक गट आणि इतर भागधारकांशी चर्चा करताना त्यांनी या विषयावर सल्लामसलत पत्रही जारी केलं. जवळपास १५ कोटी ग्राहक अजूनही फीचर फोन वापरतात. या युजर्सना प्रामुख्यानं व्हॉईस आणि एसएमएस सारख्या बेसिक टेलिकॉम सर्व्हिसेसची गरज असते.
ग्राहकांना निवडीचा अधिकार
वृद्ध ग्राहक आणि विशेषत: ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्हॉईस आणि एसएमएस-ओनली व्हाउचर उपयुक्त ठरतील, असं ट्रायनं म्हटलंय. ग्राहकांना निवडीचा अधिकार असला पाहिजे. वेगवेगळे व्हॉईस आणि एसएमएस व्हाउचर्सचे अनेक फायदे असतील. यामुळे व्हॉईस-केंद्रित युजर्सच्या गरजा, परवडणाऱ्या योजना, फ्लेक्सिबलिटी आणि कस्टमायझेशन तसंच मार्केट सेगमेंटेशन यासारख्या विविध पैलूंची पूर्तता करण्यास मदत होईल. ट्रायनं म्हटलंय की, विशेषत: ग्रामीण भागातील वृद्ध लोक माहिती अभावी डेटा सेवा वापरण्यास कमी इच्छुक आहेत.