Cred Cyber Fraud : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कुणालाही कॉल केल्यानंतर एक सूचना ऐकू येते. तुम्हाला पोलीस अथवा सीबीआयकडून फोन आला तर सावध व्हा, हे सायबर गुन्हेगार असू शकतात. याचा तुम्हाला त्रास वाटत असेल. मात्र, बेंगळुरूमध्ये घडलेल्या एका प्रकरण वाचून याचं गांभीर्या समजू शकतं. एका मोठ्या सायबर गुन्ह्यात बेंगळुरू पोलिसांनी गुजरातमधून ४ जणांना अटक केली आहे. या लोकांवर क्रेडिट कार्ड पेमेंट प्लॅटफॉर्म CRED च्या खात्यातून १२.५ कोटी रुपये लंपास केल्याचा आरोप आहे. या सायबर फसवणुकीत अॅक्सिस बँकेच्या एका व्यवस्थापकाचाही सहभाग आहे.
ही संपूर्ण फसवणूक एका कंपनीच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर, अॅक्सिस बँक देखील रडारवर आली आहे. कारण, बँकेने बनावट कागदपत्रांच्या आधारे एका खात्याची महत्त्वपूर्ण क्रेडेन्शियल बदलून ती सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात दिली. म्हणजे एकप्रकारे कुंपणानेच शेत खायला मदत केल्याचा प्रकार म्हणावा लागेल. या गुन्ह्यातील मास्टरमाइंड वैभव पिटाडिया असून तो गुजरातमधील अॅक्सिस बँकेत रिलेशनशिप मॅनेजर आहे. वैभवने CRED च्या कॉर्पोरेट खात्यातील त्रुटींचा फायदा घेतला. काही लोकांशी संगनमत करून आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून त्याने अवघ्या २ आठवड्यात CRED च्या खात्यातून १२.५ कोटी रुपये हडप केले. क्रेडिट खात्यातून इतर खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यासाठी ३७ व्यवहार करण्यात आले. CRED ने त्यांच्या खात्यातील रकमेची जुळवाजुळव केली तेव्हा फसवणूक उघड झाली.
क्रेडला फसवण्यासाठी कसा शिजला प्लॅन?
CRED च्या नोडल खात्याशी जोडलेली २ निष्क्रिय कॉर्पोरेट खाती असल्याचे वैभवने हेरलं. ही खाती ड्रीम प्लगपे टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर होती. पिटाडिया याने ही खाती पुन्हा सक्रिय करण्याच्या प्रक्रियेची माहिती होती. याचा फायदा त्याने उचलला. इंस्टाग्रामवरुन ओळख झालेली नेहा बन या तरुणीला वैभवने सोबत घेतलं. तिला CRED ची बनावट व्यवस्थापकीय संचालक (MD) केलं.
गुजरातमधील अंकलेश्वर शाखेतील अॅक्सिस बँकेत बनावट कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग (CIB) फॉर्म आणि इतर कागदपत्रे सादर केली. याचा वापर करून, एक वापरकर्ता खाते तयार केले गेले. यात सर्व नवीन मोबाईलक्रमांक देण्यात आला. नवीन ओळखपत्रांच्या मदतीने वैभव आणि नेहाने अनेक अनधिकृत व्यवहार केले. प्लॅन यशस्वी झाल्यानंतर वैभवने पैसे हस्तांतरित करण्यासाठी शैलेश आणि शुभम नावाच्या २ साथीदारांना सोबत घेतलं. ज्यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन पैसे हस्तांतरित करण्यासाठी मुळे खाते उघडले.
क्रेड कंपनीला २ दिवसानी जाग
ही फसवणूक CRED च्या १३ नोव्हेंबर रोजी नियमित बँक खात्याच्या ताळमेळाच्या वेळी उघडकीस आली. फिनटेक कंपनीला १२.५ कोटींची तफावत आढळून आली. त्यांनी त्वरित अॅक्सिस बँकेला माहिती दिली. २९ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान अनधिकृत व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.