Consumer Rights : पाण्याची बाटली किंवा इतर पॅकेज्ड वस्तू खरेदी करताना तुमच्याकडून एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेतल्याचा अनुभव आहे का? यापुढे असे घडल्यास तुम्ही देखील विक्रेत्याला चांगला धडा शिकवू शकता. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये बसून जेवताना पाण्याची बाटली किंवा इतर पॅकेज्ड वस्तूंच्या छापील किमतीपेक्षा जास्त पैसे वसूल करणाऱ्या दुकानदारांना राज्य ग्राहक आयोगाने मोठा दणका दिला आहे. "एअर कंडिशनिंग, बसण्याची सोय किंवा चांगली सर्व्हिस या नावाखाली पॅकेज्ड वस्तूंच्या एमआरपीपेक्षा एक रुपयाही जास्त आकारता येणार नाही," असे आयोगाने आपल्या महत्त्वपूर्ण निकालात स्पष्ट केले आहे.
नेमकी घटना काय?
१२ डिसेंबर २०२३ रोजी एक महिला ग्राहक चंदीगडमधील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेली होती. जेवणानंतर आलेल्या १,९२२ रुपयांच्या बिलामध्ये पाण्याची एक बाटली ५५ रुपयांना लावण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्या बाटलीवर छापील किंमत केवळ २० रुपये होती. ३५ रुपये जास्तीचे आकारल्याने या सजग ग्राहकाने तत्काळ ग्राहक मंचाचे दार ठोठावले.
वकिलाशिवाय लढल्या अन् जिंकल्या!
जिल्हा मंचाने सुरुवातीला ही तक्रार फेटाळून लावली होती. मात्र, हार न मानता या महिलेने राज्य ग्राहक आयोगात दाद मागितली. विशेष म्हणजे, त्यांनी कोणत्याही वकिलाची मदत न घेता स्वतःची बाजू स्वतः मांडली. आयोगाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत ९ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या बाजूने निकाल दिला. आता संबंधित रेस्टॉरंटला नुकसानभरपाई म्हणून या ग्राहकाला ३,००० रुपये द्यावे लागले आहेत.
हॉटेलचा दावा आयोगाने ठरवला बिनबुडाचा
रेस्टॉरंटने कोर्टात असा युक्तिवाद केला की, आम्ही ग्राहकाला अलिशान वातावरण, एअर कंडिशनिंग आणि टेबल सर्व्हिस देतो, म्हणून किमती जास्त आकारल्या जातात. मात्र, आयोगाने हा तर्क पूर्णपणे फेटाळून लावला. "रेस्टॉरंटला त्यांच्या स्वतःच्या पदार्थांच्या किमती ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे, मात्र ज्या वस्तूंवर एमआरपी अंकित आहे, त्यांची विक्री 'लीगल मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम, २०११' नुसारच होणे बंधनकारक आहे," असे आयोगाने बजावले.
वाचा - एका चुकीच्या क्लिकने 'आयुष्यभराची कमाई' साफ; सायबर भामट्यांनी चलानच्या नावाखाली लुटले ३.६ लाख
निकालाचा ग्राहकांसाठी संदेश
MRP म्हणजे काय? एमआरपीमध्ये सर्व प्रकारचे टॅक्स, पॅकेजिंग खर्च आणि विक्रेत्याचा नफा आधीच समाविष्ट असतो. कोणतीही सीलबंद किंवा प्री-पॅक्ड वस्तू (पाणी, कोल्ड ड्रिंक, चिप्स) हॉटेलमध्ये विकली जात असेल, तर त्यावर जास्तीचे पैसे मागणे हा कायद्याचा भंग आहे. हा निकाल देशभरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी एक स्पष्ट संदेश आहे की, सेवेच्या नावाखाली पॅकेज्ड वस्तूंची लूट खपवून घेतली जाणार नाही.
