नवी दिल्ली: जागतिक भू-राजकीय अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगभरातील मध्यवर्ती बँकांनी पुन्हा एकदा सोने खरेदीचा वेग वाढवला आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालानुसार, २०२५ या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत मध्यवर्ती बँकांच्या सोन्याच्या खरेदीत मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. या तिमाहीत मध्यवर्ती बँकांनी २२० टन सोन्याची निव्वळ खरेदी केली. हा आकडा मागील तिमाहीच्या तुलनेत २८ टक्के अधिक आहे, जो सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहण्याचा बँकांचा धोरणात्मक दृष्टिकोन दर्शवतो.
जागतिक स्तरावर सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले असतानाही मध्यवर्ती बँकांनी केलेली ही मोठी खरेदी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी स्पष्ट करत आहे. डॉलर-आधारित मालमत्तेवरील अवलंबित्व कमी करणे, चलन आणि महागाईच्या जोखमीपासून बचाव करणे, हे खरेदीमागचे मुख्य कारण आहे. या तिमाहीत नोंदवलेल्या खरेदीमध्ये कझाकिस्तानच्या नॅशनल बँकेने १८ टन एवढे सर्वाधिक सोने खरेदी केले आहे. त्यापाठोपाठ सेंट्रल बँक ऑफ ब्राझीलने १५ टन एवढे २०१७ नंतर पहिल्यांदाच मोठी खरेदी केली आहे.
Q3 मधील एकूण मागणीपैकी सुमारे ६६ टक्के खरेदीची माहिती सार्वजनिकपणे उघड झाली नाही, जो २०२२ पासून दिसून येणारा एक नवीन ट्रेंड आहे. यामुळे हे सोने कोणी खरेदी केले हे जगासमोर येऊ शकलेले नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने देखील सोन्याच्या साठ्यात सातत्याने भर घालणे सुरू ठेवले आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या काळात RBI ने जवळपास ६०० किलो (०.६ टन) सोने खरेदी केले. यामुळे सप्टेंबर २०२५ च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देशाचा एकूण सोन्याचा साठा ८८० टनांवर पोहोचला आहे.
