भारताचा शेजारी देश चीन आणि मित्र देश जपान यांच्यातील तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर, चीननेजपानमधून होणाऱ्या सागरी खाद्यपदार्थांच्या (Sea Foods) आयातीवर अचानक प्रतिबंध लादला आहे. यामुळे भारतीय सी फूडची निर्यात वाढली आहे. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या दांडग्या शुल्कामुळे (heavy tariff) भारतीय सी फूड उद्योगाला (मत्स्य निर्यात बाजार) मोठा फटका बसला असतानाच, ही निर्यात वाढली आहे.
बीजिंगने बुधवारी, तैवानच्या मुद्द्यावरून जपानसोबतच्या डिप्लोमॅटिक लढाईत आपली आर्थिक ताकद दाखवत जपानी सी फूड आयातीवर पूर्णपणे बंदी घातली. याचा फायदा भारतीय सी फूड उद्योगाला झाला. भारताची चीनमधील निर्यात वाढली. परिणामी, इंडियन सी फूड निर्यातदारांच्या शेअर्समध्ये 11% पर्यंतची वाढ दिसून आली आहे. ट्रंप टॅरिफचा फटका बसलेल्या या क्षेत्रासाठी हा मोठा दिलासा आहे.
अवंती फीड्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ -
तेलंगणाची सी फूड कंपनी अवंती फीड्सचे शेअर जवळपास 10% वाढून बंद झाले, जी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळातील सर्वात मोठी दैनंदिन वाढ आहे. तर, सी फूडचे मोठे उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या कोस्टल कॉर्पोरेशनचे शेअर 5% पर्यंत वधारले आहेत.
चीनने जपानी सीफूड आयातीवर पूर्णपणे निर्बंध घातले आहेत. कारण जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांनी तैवान वादाचा संबंध जपानच्या सुरक्षिततेशी जोडला होता. दरम्यान, भारत रशियन तेलाची खरेदी करत असल्याने, अमेरिकेने भारतावर 50% अतिरिक्त शुल्क लादले होते. या टॅरिफमुळे भारतीय कोळंबी आणि मत्स्य निर्यातीवर परिणाम झाला होता. गेल्या महिन्यात (ऑक्टोबरमध्ये) अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत 9% घट झाली होती, पण चीनच्या अचानक वाढलेल्या मागणीने भारतीय मच्छीमारांना संजीवनीच मिळाली आहे.
